बारामती : महान्यूज लाइव्ह
बारामती शहरात निरा कालवा लगत सुरू असलेले अस्तरीकरण व सुशोभीकरणाच्या कामात काल रात्री येथील दत्त मंदिर रातोरात हटवले, त्याची चर्चा बारामती शहरात आज सुरू होती. प्रशासनाने कोणतीही कल्पना न देता व कोणालाही कळू न देता रातोरात हे मंदिर हटवले.
बारामती मध्ये सध्या कालव्याचे सुशोभिकरण व अस्तरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामादरम्यान हे मंदिर हटवले जाईल अशी चर्चा सुरू होती, परंतु त्याची कोणतीही चर्चा प्रशासनाने केली नव्हती. काल रात्री अचानक हे मंदिर हटविण्यात आले. अर्थात हे मंदिर कोणी हटवले याची कोणालाही माहिती नाही.
दरम्यान या संदर्भात मनसेचे नेते सुधीर पाटसकर यांनी पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानात ज्याप्रमाणे हिंदूंची मंदिरे हटवली जातात, तसाच काहीसा प्रकार झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.











