बारामती : महान्यूज लाईव्ह
इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांना बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. त्यांनी शिवचरित्र लेखनातील विविध विचार प्रवाहांचा चिकित्सक अभ्यास या विषयावर प्रबंध सादर केला होता.
डॉ. कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक चरित्रे लिहीली आहेत. त्यांचा अभ्यासही दांडगा आहे. या चरित्रांमध्ये वैविध्य आहे. विविध विचारप्रवाहांचा प्रभाव शिवचरित्र लेखनावर पडला आहे. सत्यशोधकी, नवमार्क्सवादी, प्राच्यविद्या मार्क्सवादी, राष्ट्रवादी, सबाल्टर्न, स्त्रीवादी अशा विविध दृष्टीकोनातून त्यांनी सुमारे १०१ शिवचरित्रे लिहीली आहेत.
डॉ. कोकाटे यांनी राज्यासह देशाच्या विविध कानाकोपऱ्यात हजारो व्याख्याने दिली असून त्यांच्या व्याख्यानांतून जातीभेदाची दरी कमी करण्यासाठी खूप मोलाचे प्रयत्न झाले आहेत.
शिवचरित्रांमधील प्रेरणा, राजकीय व ऐतिहासिक तथ्ये यांचा अभ्यास त्यांनी सादर केलेल्या प्रबंधात करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन त्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. या प्रबंधासाठी त्यांना इतिहास अभ्यासक डॉ. पी.डी. जगताप यांनी मार्गदर्शन केले.










