महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
कॉंग्रेसचे आमदार निधी मिळत नाही, म्हणून नाराज असतानाच जालन्याचे कॉंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना थेट उपमुख्यमंत्र्यांनी फोन केला आणि तुमची नाराजी मी दूर करणार, येणारा नवीन निधी तुमच्या नगरपरीषदेला मी देणार..अजितदादा एवढे बोलले आणि गोरंट्याल देखील म्हणाले…दादा तुमच्यावर पूर्ण भरोसा..` आणि त्यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.
महाविकास आघाडीत दर आठवड्याला नवीन ट्विस्ट येतो आणि राज्य सरकार वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत येते. विकासाच्या निधी वाटपावरून कॉंग्रेसचे आमदार नाराज आहेत. ते उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही कॉंग्रेस आमदारांनी दिला. त्यावरून सरकारमध्येच तिढा निर्माण झाला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे शब्द देत आमदारांची नाराजी दूर करण्यास सुरवात केली आहे. जालन्यात अर्जून खोतकरांना निधी मिळतो आणि आम्हाला नाही अशा कारणाने जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल हे देखील नाराज होते. अजित पवार यांनी त्यांना थेट फोन केला. खोतकर यांनी मागितलेला निधी हा ३१ मार्चच्या पूर्वीचा होता. येणारा नवीन निधी तुमच्या नगरपरीषदेला देणार हा माझा शब्द आहे असे सांगितल्यानंतर गोरंट्याल यांची नाराजी दूर झाली. तुमची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट घडवतो असेही दादांनी आश्वासन दिले आणि उपोषणाचा इशारा दिलेले गोरंट्याल शांत झाले.











