बारामती : महान्यूज लाईव्ह
अजितदादा आता माध्यमांशी कमी बोलतात आणि कामांना प्राधान्य देतात.. याची प्रचिती कालच ८०० बेडचे कोविड सेंटर पुण्यात उभे करून त्यांनी दिलीच होती, आज बाारमती तालुक्यातील वाकीच्या तलावात पाणी सोडून अजितदादांनी दिलेला शब्द पाळला..
ग्रामीण भागात शेतीसाठी पाणी हा जिव्हाळ्याचा व संवेदनशील विषय असतो. बारामती तालुक्यातील वाकी गावामध्ये शेती सिंचनाची कोणतीही सोय नसल्यामुळे पाणी सोडण्याची अनेक दिवसाची ग्रामस्थांची मागणी होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी वाकी तलावामध्ये कायमस्वरूपी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते.
निवडणूका झाल्या आणि अजितदादा उपमुख्यमंत्री बनले. त्याचवेळी त्यांच्या पुढाकारातून बारामतीत विकासाची कामे सुरू झाली. ती वेगाने सुरू झाली. त्यानंतर अजितदादांनी दिलेला शब्द खरा केला. सर्व बाबींची पूर्तता करून कालच तलावामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना अंतर्गत खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्यात आले.
या प्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर, कार्यकारी अभियंता श्री. कानिटकर, दूध संघांचे चेअरमन संदीप जगताप, कार्यकारी अभियंता यांत्रिकी श्री.काझी, उपअभियंता श्री.भुजबळ, संचालक लालासाहेब नलवडे, उपसरपंच दादासाहेब जगताप, दादासाहेब कारंडे व मूर्टी, वाकी, मोराळवाडी व कानाडवाडी येथील शेतकरी व प्रमुख उपस्थित होते.
वाकी येथील लघु प्रकल्प हा पाटबंधारे तलाव असून त्याची क्षमता १०२ एम. सी. एफ.टी. या क्षमतेचा असून यातील पाण्याचा फायदा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होणार असून मुर्टी, वाकी, मोराळवाडी, कानाडवाडी, चोपडज व वडगाव निंबाळकर परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे सदरचे काम मार्गी लावले आहे, त्याबद्दल शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले असे तालुका अध्यक्ष श्री.संभाजी होळकर यांनी सांगितले.










