महान्यूज:आजची गझल
खरी निरागस तुझ्यासारखी दुनिया असती तर?
भल्या माणसा मनासारखी दुनिया असती तर?
बागेमधली फुले पाहिली कुजबुजताना की
“माळावरल्या फुलासारखी दुनिया असती तर?”
प्रश्नांकित तो उभा राहतो समोर शाळेच्या ?
बाकावरल्या मुलासारखी दुनिया असती तर?
नोकरीतल्या ताणाने तो वैतागत म्हणतो
नशिबवान तू तुझ्यासारखी दुनिया असती तर
पडद्यावरची फिल्मी दुनिया पाहत म्हणतो तो
चित्रपटाच्या जगासारखी दुनिया असती तर?
पिंज-यातली अबोल फडफड सांगत असते मज
खुल्या नभातिल ढगासारखी दुनिया असती तर?
एक झोपडी उदास होते हेलावुन म्हणते
बंगल्यातल्या सणासारखी दुनिया असती तर
बटा हासुनी सावरायचा चंद्रावरच्या जो
त्या पुनवेच्या ढगासारखी दुनिया असती तर
भल्या पहाटे कळी लाजरी उमलत म्हणते की
गवतावरल्या दवासारखी दुनिया असती तर
गझलकार : दिनेश भोसले
परिचय – दिनेश भाऊराव भोसले, शिक्षक
श्रीमती एस.डी.गणगे प्रशाला त्रिवेणीनगर तळवडे
व कर्मवीर ना.मा.गडसिंग गुरुजी ज्युनियर काॅलेज, कृष्णानगर, चिंचवड,
पिंपरी चिंचवड म न पा तर्फे सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सन्मानित, निवेदक (मराठी, हिंदी, इंग्रजी कार्यक्रम) लेखक, कवी, गझलकार (मराठी, हिंदी/उर्दू), ‘स्पर्श’ कादंबरी प्रकाशित 2004
चंद्रामृताचे तळे या संग्रहामध्ये तसेच विविध दिवाळी अंकात कविता व गझला प्रकाशित, समाजप्रबोधनपर, विद्यार्थी प्रेरणा , विविध महापुरुष यांवर विविध विद्यालये, महाविद्यालये येथे व्याख्यानमाला. कथा, लेख, कविता, गझल लेखन, सध्या मराठी, हिंदी, उर्दू गझल लेखन,
बारामती, इंदापूर, बार्शी, राजगुरुनगर, चाकण, वाघोली, डोंबिवली, सोलापूर,चाळीसगाव, चाळकवाडी, पुणे व पिंपरी चिंचवड येथे विविध कवी संमेलनात कविता व गझल मुशाय-यामध्ये गझल सादरीकरण, 89 व 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता व गझल सादरीकरण.
डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या 21 व्या राष्ट्रीय बंधुता संमेलनामध्ये 2020 मधील 22 व्या राष्ट्रीय बंधुता संमेलनाचा कवीवर्य नामदेव ढसाळ पुरस्कार जाहीर. ‘मराठबोली राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत’ द्वितीय क्रमांक प्राप्त ( जानेवारी 2018), समरसता काव्य करंडक स्पर्धेमध्ये ‘काव्यलेखन ‘ प्रकारात ‘मी गेल्यावर ‘ या गझलेस तृतीय क्रमांक पुरस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित ‘काव्य रंगे उषःकाल संगे’ या दिवाळी पहाट 2017 कवी संमेलनात प्रथम क्रमांक प्राप्त. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित श्रावणी काव्य स्पर्धेमध्ये (2017) द्वितीय. बार्टी पुणे (2016)आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक, युवा चैतन्य प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित श्रावणी काव्यस्पर्धेमध्ये (2016)
उत्तेजनार्थ तब्बल 30 कवी संमेलने, 16 गझल मुशायरे, 2 आॅनलाईन गझल मुशायरे, 4 पुस्तक प्रकाशन सोहळे, 4 परिसंवाद , 2 शेतकरी मदत निधीसाठी कला व सांस्कृतिक कार्यक्रम, 4 संगीत मैफिली इ.कार्यक्रमांचे निवेदन, ज्या प्रशालेमध्ये कार्यरत तेथील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन (7 वर्षे सांस्कृतिक विभाग प्रमुख) व संस्थेच्या वर्धापन सोहळ्यांचे निवेदन(ऑक्टोबर 2012, 2018 व 2019). समरसता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आयोजित ‘कवितेकडून कवितेकडे’ या कार्यक्रमास ‘प्रमुख पाहुणे ‘ म्हणून उपस्थित (2017). फत्तेचंद जैन ज्युनियर काॅलेज चिंचवड येथे ‘वाङमय मंडळ उद्घाटन’ सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित (2017), टाटा मोटर्स समाज विकास केंद्र आयोजित 1ली ते 12 वी यशवंत विद्यार्थ्यी व पालक सत्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून (2017). सरस्वती नाइट काॅलेज ऑफ आर्ट्स, काॅमर्स व सायन्स काॅलेज , पुणे येथील ‘राज्यस्तरीय कवी केशवसुत काव्य करंडक स्पर्धे’ चे परीक्षण(फेब्रुवारी 2018)ॉशब्दधन काव्य मंच तर्फे सन 2018 चा ‘छावा पुरस्कार ‘ प्राप्त
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व तेजस्विनी संस्था आयोजित ‘गझल मुशायरा’ – निवेदन (1 सप्टेंबर2018)
18 वे साहित्यिक कलावंत संमेलन 2018 यामध्ये यशस्वी सहभाग (निमंत्रित कवी)
महाराष्ट्र साहित्य कामगार परिषद, गदिमा प्रतिष्ठान आयोजित 26 व्या गदिमा जन्मशताब्दी सोहळ्यात आम्ही गदिमांचे वारसदार मध्ये निमंत्रित कवी (2019)
दुसरे राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलन, मंगळवेढा (निमंत्रित कवी)
पी.सी.सी.पी. इंजिनिअरींग काॅलेज चिंचवड येथे वक्तृत्व स्पर्धांचे परीक्षण(मार्च 2015)
डी. वाय. पाटील बी. एड्. महाविद्यालय तर्फे माजी विद्यार्थी सन्मान सोहळ्यात सर्वोत्कृष्ट General Alumini म्हणून सन्मान ( मार्च 2019 )
गझलेच्या प्रसारासाठी पिंपरी चिंचवड मध्ये स्थापन झालेल्या गझलपुष्प समूहाचे संस्थापक
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











