यवतच्या कोवीड सेंटर मधून तीन कोरोना बाधीतांची धुम; प्रशासनाची डोके दुखी वाढली
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड च्या ग्रामीण भागातील यवत येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटर मधून काल शुक्रवारी (ता . २१) तीन कोरोना बाधित पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, दरम्यान याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राहू (ता. दौंड) परिसरातील एका डेअरी फार्म येथील तीन परप्रांतीयांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना तीन दिवसापुर्वी यवत येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र संबंधित कोरोना बाधित रुग्णांनी कोवीड सेंटर मधून पळ काढला आहे, या विचित्र घटनेने प्रशासनाची झोप उडाली आहे. एकत्र कोरोना रुग्ण शोधून काढलेले असताना, त्यांची व्यवस्था करण्यात आली असताना ते पळून जात असल्याने प्रशासन वैतागले आहे.
यवत पोलीस व आरोग्य विभागाला हे रूग्ण शोधण्याची वेळ आली आहे. संबंधित रूग्ण हे परप्रांतीय असल्याने ते पळून कोठे गेले असतील याची चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना चा संसर्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे, त्यातच हे कोरोना बाधीत रूग्ण पळून गेले आहेत, आता कोणा कोणाच्या संपर्कात आले आहेत हेही एक कारण शोधावे लागेल.










