महान्यूज : आजची गझल
या नजरेमधली किमया मी शिकून घ्यावी म्हणतो
हलकेच तुझ्या श्वासावर मी गझल लिहावी म्हणतो…!
जी वाटचाल केली मी ते एक विडंबन होते मी अस्सल प्रत जन्माची यापुढे जगावी म्हणतो…!
प्रेमात हुंदक्यांच्या जर मुसमुस ही हमसुन पडली अश्रूत वेदना मी ही किंचीत भिजवावी म्हणतो…!
सोबती क्षणाचे माझे क्षण सारे फसवे माझे मयसभा अशा स्मरणांची मी उधळुन द्यावी म्हणतो…!
आभास तुझा मज छळतो हा दोष तुझा की माझा हे कळण्या तव हृदयाची मी धडधड व्हावी म्हणतो…!
अन्यथा कुठेही माझी उरणार निषाणी नाही मी खिंड सांत्वनांचीही किंचित् लढवावी म्हणतो…!
हो मीच ठेवला होता “अहवाल” गोपनिय माझा ती कागदपत्रे आता मी खुली करावी म्हणतो…!
गझलकार – प्रशांत वैद्य
प्रशांत वैद्य, समाधान निवास, कासार आळी, संत सेना महाराज चौक, कल्याण – ४२१३०१, मो. – ९९२०२२५१०८
गेल्या ३५ वर्षांपासून मराठी कविता, गझल आणि गीत लेखन.
प्रकाशित साहित्य : ‘अहवाल’ हा गझलसंग्रह प्रकाशित. ‘काफला’ ह्या पहिल्या प्रातिनिधिक गझलसंग्रहात गझला समाविष्ट. विविध नियतकालिकांमधून गझला प्रकाशित. ८० च्या दशकात अनेक साप्ताहिके, नियतकालिके आणि मासिके यातून गझल सदर चालवले. तसेच वार्तासूत्र, नगरवार्ता ह्या साप्ताहिकात गझल सदर लेखन. कल्याण नागरिक…वार्ता विलास…विश्वोध्दार या अध्यात्मिक मासिकातही मराठी गझल प्रकाशित. ‘कॉलेजच्या कट्ट्यावर’ आणि तुझ्यापरी कुणीतरी’ ह्या दोन भावगीतांच्या ध्वनिफिती प्रसिद्ध. उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, डॉ. नेहा राजपाल, विजय गटलेकर, अजित केतकर इत्यादी गायकांनी गीते गायली आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात ह्या राज्यात विविध गझल मुशायऱ्यात सहभाग. चंद्रपूर येथील ‘सांजप्रभा प्रतिष्ठान’ च्या अखिल भारतीय मराठी गझल मुशायरा दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष. गझलसागर प्रतिष्ठान मुंबई आयोजित नवव्या अखिल भारतीय गझल मुशायरा संमेलनात अध्यक्ष.डोंबिवली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथमच मराठी गझल कट्टा आयोजनात प्रमुख सहभाग.
सौजन्य: गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











अप्रतिम गझल प्रशांत सर , मनःपूर्वक अभिनंदन !