महान्यूज: आजची गझल
दोघांमधील ‘मी ‘ ला बाजू जरा करू या
अन् वाद आपसातिल चल आज विस्मरू या
भौतिक सुखात आपण विसरून बैसलो जी
मानव्यता पुन्हाती प्रांजळपणे स्मरू या
इतरां मधील अवगुण शोधायच्या अगोदर
ऐना जरा स्वतःच्या चर्ये पुढे धरू या
सारून दूर अभिनय चल एकदा खरोखर
दोघे परस्परांच्या डोळ्यातुनी झरू या
शस्त्रे करी तयांच्या लखलाभ हो तयांना
आपण करात अपुल्या बस लेखणी धरु या
योजुन प्रकाश सारा गिळला जरी तमाने
जाळून काळजाला रोशन शहर करू या
सक्षम पिढी कवींची चालून येत आहे
आपण ‘ मसूद ‘ आता बाजू जरा सरू या
गझलकार – मसूद पटेल
परिचय : मसूद पटेल,पुसद, सध्या वास्तव्य :- पुणे.
शिक्षण :- बी. कॉम. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सेवेतून वर्ष २०१४ ला सेवानिवृत्त. मोबाईल नंबर :- ९६०४६५३३२२
महाराष्ट्रातील विविध गझल मुशायऱ्यात सहभाग. विविध दिवाळी अंक आणि नियतकालिकांमधून गझला प्रकाशित. ‘ गुलमोहर ‘ काव्य संग्रह प्रकाशित. एक गझल संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर.
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड










