इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील रामकुंड परिसरातील एका शेतात देशी दारूच्या बाटल्यांमध्ये हे बनावट दारू मिसळून पॅकिंग करण्याचा एक बेकायदेशीर व्यवसाय सुरू होता, तो इंदापूर पोलिसांनी उध्वस्त केला असून दोघांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आसिफ रमजान तांबोळी (रा. इंदापूर) व विजय आनंद घाडगे (रा. गलांडवाडी नं १) ही या दोघांची नावे आहेत. या दोघांनी रामकुंड परिसरातील सदाशिव काळे यांची शेत भाड्याने घेऊन महिना दहा हजार रुपये भाडेपट्ट्याद्वारे घेऊन तेथे बाटलीचे बूच नव्याने बसवण्याची मशीन घेतली होती. याठिकाणी अशाप्रकारचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी येथे छापा टाकला. तेव्हा त्या वेळी बाटलीचे बूच नव्याने बसवण्याची 35 हजार रुपये किमतीची एक मशीन, फेविकॉल च्या बाटल्या, रिकामे कॅन व त्या कंपनीचे 180 टोपण त्यांना तेथे आढळून आले. या ठिकाणी त्यांना काचेच्या वेगळ्या बाटल्या व देशी दारूच्या टॅगो ब्रँडच्या काही मोकळ्या बाटल्या त्या ठिकाणी आढळून आल्या. देशी दारू च्या कंपनीच्या नावाने बनावट दारू विकण्याचा या लोकांनी धंदा सुरू केला असण्याचा पोलिसांना अंदाज असून इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लोकरे पुढील तपास करीत आहेत.











