दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची संख्या लक्षात घेवून दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी पाटस संपुर्ण गाव व परिसरातील सर्व वाड्यावस्त्यां या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या आदेशांची तत्काळ आमंलबजावणी करण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहेत. त्यानुसार यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
दौंड तालुक्यातील पाटस परिसरात मागील काही दिवसापासून कोरोना बाधीत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तीन दिवसापुर्वी एका व्यवसायिकांच्या कुटूंबात सात जणांना कोरोनी विषाणुची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पाटसमध्ये आतापर्यंत ३१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या अकरा कोरोना बाधीत रूग्ण आहे. तर चार जणांचा बळी गेला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी पाटस संपुर्ण गाव व वाडीवस्त्या प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्याची विनंती दौंड पुरंदरचे प्रांतअधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार दौंड-पुरंदरचे उपविभागागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी पाटस परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन जाहीर केले आहे.










