महान्यूज : आजची गझल…
मी गुपीत या दुनियेला सांगत नाही
पोटात तिच्या काहीही थांबत नाही
ती अर्ध्या हळकुंडाने होते पिवळी
इतकी घाई एव्हाना शोभत नाही!
जेव्हा गाठोडे नसते सोडायाचे,
तेव्हाच उताविळ भूक मानवत नाही!
ती विषय नेहमी हसण्यावारी नेते
मी तिला म्हणत असतो, ही गम्मत नाही!
का भरल्या डोळ्यांदेखत गाडी सुटते…
का गाठी भेटी नंतर चालत नाही!
आजही तिची दररोज आठवण येते
आजही तिच्यावर मी रागावत नाही
मी प्रेम करावे नुसते जळण्यासाठी
जगण्याला दुसरे कारण लागत नाही
मी तेव्हा काही कुठे बोललो होतो?
मी अजूनही काहीही बोलत नाही..!
गझलकार – संजय गोरडे ‘सौभद्र’
परिचय : संजय नाना गोरडे, मांजरी, ता. गंगापूर, शिक्षण – बीए -मराठी, बीए एम.सी.जे. (मास कम्युनिकेशन ऍण्ड जर्नालिझम्)
नोकरी -महिन्द्रा अॅण्ड महिन्द्रा, नाशिक.
येथे कायमस्वरुपी कामगार,
हल्ली मुक्काम – नाशिक.
आवड/छंद- साहित्य, संगीत, पेंटिंग, फोटोग्राफी!
लेखन – ‘सौभद्र’ या नावाने कविता, गजल, ललित,
तसेच मुक्तछंद इत्यादी लिहितात… दोन संग्रह (कविता/गजल) प्रकाशनाच्या वाटेवर… मोबा. 7276091011











