महान्यूज: आजची गझल
घे उन्हे हातात तू आभाळण्याआधी
एक ठिणगी पेटवू अंधारण्याआधी
चेहरा की मुखवटा पाहून घे कायम
तू लळा कोणास इतका लावण्याआधी
वेदनाही लाभते बस भाग्यवंताला
घे तिला पदरात टाहो फोडण्याआधी
पाहिले डोळ्यात का नाहीस बकऱ्याच्या
मान तू फसवून त्याची कापण्याआधी
चेहरा पाहून घ्यावा आपला आपण
आरसा कोणापुढेही ठेवण्याआधी
मोकळे बोलून पाहू एकमेकांशी
एकटेपण आत अपुल्या कोंडण्याआधी
एकदा वाऱ्यासवे भटकून घेऊ या
पायवाटा जीवनाच्या संपण्याआधी
– गझलकार : जयश्री कुलकर्णी
परिचय – कु. जयश्री शिरीष कुलकर्णी
मुक्काम : नाशिक
शिक्षण – एम.ए. डी. एड., बी.एड., डी.एस.एम., डी.सी.जे.
पत्रकारितेत पदविका प्राप्त
प्रेरक, ललकारी, शब्दांकन सारख्या नियतकालिकात आणि स्थानिक वर्तमानपत्रात लेखन
महिला दिनानिमित्त झालेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत तृतीय क्रमांक
बी.वाय.के. महाविद्यालय तर्फे राज्यस्तरीय काव्य करंडक स्पर्धेच्या निमित्ताने सन्मानचिन्ह प्राप्त
चौथ्या अखिल भारतीय काव्य संमेलनात सन्मानचिन्ह प्राप्त
काव्यहोत्र २०१६ मध्ये सहभाग
कुसुमाग्रज साहित्य संमेलन २०१७ मध्ये सहभाग
शालेय स्तरावरील बालकाव्य लेखन / सादरीकरण स्पर्धेसाठी परीक्षक
विविध गझल मुशायर्यातून गझल सादरीकरण
जिल्हा काव्यसंमेलनांचे निवेदन सूत्रसंचालन
मुंबई,पुणे ,नाशिक आकाशवाणीवरून कविता सादरीकरण
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड










