सांगली : महान्युज लाईव्ह
मध्यंतरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्री शरद पवार यांनी साखर कारखान्यांनी कोरोना च्या काळात पुढे येऊन कोविड केअर सेंटर उभारावीत अशी सूचना केली होती. त्यानंतर आता कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कोविड काळजी केंद्र ही 100 खाटांची सेंटर उभे करण्याची सूचना दिली आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोळा ठिकाणी ही केंद्रे सुरू होतील, अशा स्थितीत पुणे जिल्ह्यात खाजगी कारखान्यासह 17 ठिकाणी केंद्र सुरू होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
काही दिवसांपूर्वी कोरोनाचे वाढते रुग्ण आणि रुग्णालय अपुरी पडत असल्याची स्थिती लक्षात घेत श्री पवार यांनी आता यामध्ये साखर कारखान्यांनी देखील पुढाकार घ्यावा अशी सूचना केली होती. त्याची तातडीने अंमलबजावणी करत कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री व आरोग्य राज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली. त्यावरून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली व त्यानंतर थेट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत कारखान्यांना पत्र देऊन कोविड काळजी केंद्र उभारण्याची सूचना दिली आहे.
लवकरच गळीत हंगाम सुरू होणार असून येणाऱ्या ऊसतोड मजुरांची व परिसरातील ऊस उत्पादक सभासदांची काळजी घेण्याच्या दृष्टीने विना लक्षणाच्या रुग्णांसाठी अशा प्रकारची सेंटर्स उभी करणे अत्यंत गरजेचे आहे. येणाऱ्या काळात कोरोनाचा प्रसार आणखी वाढणार आहे, त्यादृष्टीने आतापासूनच कारखान्यांनी तयारी करावी, ही तयारी फक्त कोल्हापूर किंवा पुणेच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात करावी लागणार आहे आणि फक्त साखर कारखानेच नव्हे तर मोठ्या कंपन्या मोठमोठे खाजगी प्रकल्प यांनी देखील या मध्ये योगदान देण्याची गरज आहे.











