सुरेश मिसाळ, महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पुणे- सोलापूर महामार्गावर गागरगावच्या हद्दीत लोंढेवस्ती येथे भरधाव वेगाने चाललेल्या स्वीफ्ट कारच्या धडकेत वानर गंभीर जखमी झाले.अडीच तासांनी वनखात्याची पेट्रोलिंग जीप आली आणि वानराला बिजवडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले. तोपर्यंत स्थानिकांनी थांबून वानराचे रक्षण केले.
ही घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. गागरगावच्या हद्दीत महामार्गावर स्वीफ्ट कारने वानराला जोरदार धडक देवून वाहन चालक तसाच निघून गेला. दरम्यान ते वानर जखमी झाल्यामुळे व घाबरल्यामुळे सैरभैर होवुन उभा राहण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पाय मोडल्यामुळे ( फ्रॅक्चर) त्याला उभा राहता येत नव्हते. हे पाहून जवळच असणा-या लोंढेवस्ती येथील अमोल लोंढे,बापू लोंढे,मिनल भोसले, रघुनाथ लोंढे यांनी दुसरे वाहन त्याला धडकू नये म्हणून जखमी वानराच्या कमरेला दोरीने बांधून त्याची दोरी रस्त्याच्या कडेला एका झुडुपाला बांधली. मात्र धडपडत असणारे वानर रस्त्याच्या कडेला असणा-या चारीत पडले. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना अनेक वेळा मोबाईलवर संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान वनविभागाचे वनरक्षक संतोष गिते , वनमजूर सुभाष काळेल, नाथा काळेल हे सकाळी साडेआठ वाजता तिथे आले. वानर लोकांची गर्दी पाहून जास्तच घाबरले होते. तेथील नागरीकांनी वनविभागाशी संबंधितांना मोबाईलवर वानर घेवून जाण्यासाठी वनखात्याचे वाहन पाठवून देण्याची विनंती केली. अखेर कळस येथून अडीच तासांनी वनखात्याची पेट्रोलिंग जीप साडेदहा वाजता गागरगावला आली. त्यात वानराला टाकून बिजवडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले.
बिजवडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती काझडे यांनी वानरावर प्रथमोपचार केले. वानर गंभीर जखमी झाले असून वानराच्या मानेला, गळ्याला मोठी जखम झाली आहे. गळ्याचा भाग मोठ्या प्रमाणात फाटला आहे. पाठीमागील उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. डोळ्याला, तोंडाला खरचटले आहे. छातीला मार बसला आहे अशी माहिती डॉ. मारुती काझडे यांनी महान्यूज लाईव्ह ला दिली.
वानराला गंभीर इजा झाल्याने त्यावर इथे सर्व उपचार होत नाहीत. त्यामुळे त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला पुणे च्या कात्रज येथील वन्यप्राणी अनाथालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी लोंढे वस्तीवरील कार्यकर्ते महादेव लोंढे यांनी वनखात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.











