महान्यूज : आजची गझल
घे प्रेमावरती माझ्या तू आळ पाहिजे तितके
मन झाले नाही अजुनी घायाळ पाहिजे तितके..
हे जीवन माझे दुःखा रिंकल फ़्री कापड आहे
हाताळ कसेही याला.. चुरगाळ पाहिजे तितके..
वाईट तुझी जर वृत्ती..दिसणार जगाला नक्की
तू तिच्याभोवती कापड गुंडाळ पाहिजे तितके…
पुस्तकात आयुष्याच्या सौख्याचे पानच नाही
अध्याय चाळ तू सारे… धुंडाळ पाहिजे तितके..
मरताना नसेल सोबत यापैकी कोणीसुद्धा
नोकरी , कार ,प्रॉपर्टी …कवटाळ पाहिजे तितके…
प्रेयसी लाडके मांजर ..जातेच सोडुनी शेवट
कर लाड कितीही त्याचे..सांभाळ पाहिजे तितके…
गझलकार : संतोष वाटपाडे, नाशिक
संपर्क – ९९७५५४१५३४
शिक्षण – मेकॅनिकल इंजिनीअर
◆वयाच्या १५ व्या वर्षापासून काव्यलेखन सुरु केले.
◆आजवर काव्यक्षेत्रातील बहुतांश वृत्तात लेखन.जुन्या काळात वापरली जाणारी वृत्ते नव्याने हाताळून लोकांसमोर आणणे हा मुळ हेतू.
◆लावण्या,कटाव,मराठी गजल, हिंदी/उर्दू गजल, गाणी तसेच वृत्तबद्ध कविता या क्षेत्रात लिखाण.
◆फ़ेब्रु २०१६ मधे “हुरहुरत्या चांदराती” या नावाने स्वतःच्या गाण्यांचा एक ऑडिओ अलबम रिलीज .
◆”ही बाग कुणाची आहे ” आणि ” एखाद्या शब्दासाठी ” हे दोन वृत्तबद्ध कवितासंग्रह प्रकाशित
◆कल्याणी महिला बहुद्देशीय संस्था,नाशिक यांच्यातर्फ़े २०१६ साली “साहित्यरत्न” हा पुरस्कार.
◆कविता रसिक मंडळी पुणे यांच्याकडून 2017 सालचा काव्यतेज पुरस्कार
◆मराठी साहित्य परिषद, सिन्नर यांचा उत्कृष्ट काव्य संग्रह हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त
◆शांताबाई शेळके प्रतिष्ठान पुरस्कार
◆सुर्यकांता देवी पोटे पुरस्कार अमरावती
◆सांडू प्रतिष्ठान पुरस्कार
◆काव्य रसिक मंडळी डोंबिवली यांचा उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार
◆छत्रपती प्रतापसिंह वाचनालय सातारा यांचा पुरस्कार
स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार
◆अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, जळगाव येथे सहभाग.
◆अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथील गजल मुशायर्याचे सुत्रसंचालक











