महान्यूज : आजची गझल
थोडा दिला सुखाचा आस्वाद पावसाने
पण मांडला असा का उच्छाद पावसाने?
हलकेच तो पहाटे चुंबून ओठ गेला
छळले मला किती त्या वस्ताद पावसाने
संपेचना सखीच्या रुसव्यातला अबोला
स्पर्शून साधला मग संवाद पावसाने
तल्लीन होत कोणी मल्हार धून गाई
बरसून पण मिळवली बघ दाद, पावसाने!
गेलीत माणसेही, शेते, गुरे, घरेही
थैमान घातलेले जल्लाद पावसाने
दडला असा..नि पाणी डोळ्यातले खळेना
संसार फार केले बरबाद पावसाने!
वणवा असा भडकला की रान पेटले, पण
सपशेल तो नमवला उन्माद पावसाने
गझलकार : उर्मिला वाणी, पुणे
परीचय :
नाव- उर्मिला सहस्रबुद्धे वाणी,
हल्ली मुक्काम : पुणे
शिक्षण: B.Pharm, MBA
मागच्या ५ वर्षांपासून कविता आणि गझल लेखन.
वृत्तबद्ध कवितांमध्ये उल्लेखनीय लेखन.
विविध दिवाळी अंक तसेच मासिकांमध्ये कविता, गझल प्रकाशित. पुणे आणि परिसरातील विविध काव्यसंमेलन आणि गझल मुशायऱ्यातून सादरीकरण.
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











