घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह रविवार विशेष
पुरुष आणि स्त्रियांची तुलना सतत होत राहते आणि यामध्ये बहुतेक महिलांना झुकते माप मिळते. वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून लोकांना फसविणारे आणि कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्यांची या जगात काही कमी नाही. बहुतेकांना असे वाटते अशी फसवणूक करणारे फक्त पुरुषच असतात, बायका असे करूच शकणार नाहीत. पण आज लोकांना बघता बघता कोट्यावधी, अब्जावधी आणि त्याच्यावरची अनेक शु्न्ये लावावी लागतील अशा रकमांचा गंडा अगदी बोलता बोलता घालणाऱ्या ४ बायकांची गोष्ट तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. या ४ जणींमध्ये दोन भारतीय स्त्रियांचाही समावेश आहे.
१. चित्रा रामकृष्णा – चित्रा रामकृष्णाचे प्रकरण अगदी ताजे आहे आणि चित्रा सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे. चित्राने ज्या पद्धतीने राष्ट्रीय शेअर बाजाराला गंडा घातला, तो सगळाच प्रकार एखाद्या थ्रिलर चित्रपटासारखा होता. राष्ट्रीय शेअर बाजाराची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना तिने हिमालयीन योगी नावाच्या एका काल्पनिक व्यक्तीची निर्मिती केली. या हिमालयीन योगीकडून येणाऱ्या सूचनांनूसार एनएसईचा कारभार चालवायला सुरुवात केली. आनंद सुब्रम्हण्यम नावाच्या माणसाला जवळपास १.५० कोटी रुपये वार्षिक पगारावर चीफ
ऑपरेटींग ऑफिसर म्हणून नियुक्त केले. या सगळा या फ्रॉडचा भाग होता. तिने काही शेअर दलालांना बाजाराची माहिती अगोदर मिळेल अशी व्यवस्था केली. त्यातून या शेअर दलालांना हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला. हा सगळ्या घोटाळ्याची रक्कम ६० हजार करोड रुपयांपर्यंत सांगितली जात आहे.
यामध्ये जो हिमालयीन योगी निर्माण केला होता, तो प्रत्यक्षात आनंद सुब्ह्रमण्यमच असल्याचे सांगितले जाते. जवळपास ५ वर्षे हा प्रकार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. ज्या पद्धतीने हा सगळा कट रचला गेला, तो सगळा प्रकार सर्वसामान्यांना चक्रावून टाकणारा आहे.
अर्थातच यामध्ये चित्रा मुख्य भुमिकेत दिसत असली तरी इतरही खुप बडी नावे या सगळ्या प्रकारात असण्याची शक्यता आहे.
२. एलिझाबेथ होम्स – अमेरिकेच्या या केवळ १९ वर्षाच्या मुलीने जगातील भल्या भल्या बुद्धीमंतांनाही गंडा घातला. २००३ मध्ये तिने रक्ताच्या एका थेंबातून कॅन्सरसहीत २०० पेक्षा जास्त आजार शोधून काढणारे डिव्हाईस तयार केले असल्याचा दावा केला. तिने या डिव्हाईसचे नाव एडिसन असे ठेवले. हे नाव थॉमस एडिसन या शास्त्रज्ञांच्या नावाववरून ठेवलेले होते.
तिने सिलिकॉन व्हॅलीमध्ये थॅरॉसॉन नावाची कंपनी सुरु केली. २०१४ मध्ये या कंपनीची बाजारातील किंमत ९ अब्ज डॉलर ९ ( ५१० अब्ज रुपये ) इतकी झाली. अनेक शास्त्रज्ञ तिच्या या डिव्हाईसला तेव्हाही विरोध करत होते आणि असे होऊ शकत नाही, असे सांगत होते. परंतू एजिझाबेथ आपल्या भूरळ घालणाऱ्या शैलीने समोरच्या व्यक्तीला पटवत असे. एकेकाळी एलिझाबेथची तुलना स्टिव्ह जॉब्जशी होत होती. एलिझाबेथही स्टिव्हसारखे कपडे घालून, त्याच्यासारख्या गाड्या चालवून त्यात भर घालत होती.
रुपर्ट मर्डोक, ऑरेलकचे संस्थापक लॅरी एलिसनसारख्या लोकांनी तिच्या कंपनीत गुंतवणूक केली होती. फोर्ब्स मासिकाने तिला अब्जाधिशांच्या यादीत समाविष्ट केले होते. फॉर्च्यूननेही तिला आपल्या यादीत स्थान दिले होते.
२०१५ साली तिची कंपनी एखाद्या वाळूच्या किल्ल्यासारखी ढासळली. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका पत्रकाराने तिचा सगळा खोटेपणा उघड केला. त्यानंतर झालेल्या चौकशीत तिच्या डिव्हाईसमध्ये अनेक त्रुटी आढळल्या, ती फारच थोड्या चाचण्या या डिव्हाईसवर करत असे, अनेक चाचण्या ती दुसऱ्या यंत्रणेवर करत असल्याचेही स्पष्ट झाले. एका झटक्यात ६८ हजार करोड किंमतीची तिची कंपनी शुन्य किंमतीवर आली. एलिझाबेथ सध्या तिच्याविरुद्ध सुरु असलेल्या चौकशीला तोंड देत आहे.
३. रुजा इग्नातोवा – बल्गेरियात राहणाऱ्या रुजा इग्नातोवाने केलेला ‘ वन कॉईन फ्रॉड ‘ हा क्रिप्टो करन्सीमधील एका मोठा घोटाळा होता. रुजाने ऑक्सफोर्ड युनिव्हरसिटीमध्ये पीएचडी केली होती. ती अतिशय हुशार होती. या हुशारीनेच तिचे ‘ वन कॉईन ‘ क्रिप्टो करन्सीचा घोटाळा केला. तिने २०१४ मध्ये एक कंपनी स्थापन करून वन कॉईन क्रिप्टोकरन्सीची सुरुवात केली. ही करन्सी खरोखरच सुरक्षित आहे, अशी गुंतवणूकदारांची समजूत करून देण्यात तिने यश मिळविले. आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरत असल्याचे तिने लोकांना सांगितले. वन कॉईन काही काळातच बिटकॉईनपेक्षा मोठी होईल असे स्वप्न तिने लोकांना दाखवले.
या वन कॉईनच्या मागे जगभरातील लोक लागले. चीन, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेबरोबरच भारतातील अनेक लोकांनी यात पैसे लावले. कंपनीत काम करणाऱ्या मल्टीलेव्हल मार्केटींग करणाऱ्या एजंटांनी आपले कमीशनही त्यात गुंतवले. बघता बघता या करन्सीमध्ये जवळपास ३५ हजार करोडची गुंतवणूक झाली. यानंतर पोर्तुगालमध्ये रुजाला एका इव्हेंटसाठी बोलावण्यात आले. या इव्हेंटमध्ये रुजा वन कॉईनची गुंतवणूक इतर नेहमीच्या वापरातील चलनात कशी बदलता येईल ते सांगणार होती. या इव्हेंटमध्या रुजासाठी हजारो लोक जमले होते. परंतू रुजा तिथे पोचलीच नाही. ती लोकांचे ३५ हजार करोड घेऊन गायब झाली. त्यानंतर तिच्या अनेक साथीदारांना अटकही करण्यात आली. परंतू रुजा मात्र आजपर्यंत गायब आहे. वन कॉईन घोटाळा हा इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यातील एक घोटाळा समजला जातो.
४. चंदा कोचर – ऐकेकाळी आयसीआयसीआय बॅंकेची मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेल्या चंदा कोचर यांची गणना भारतातील सर्वात यशस्वी महिलांमध्ये होत होती. एक आदर्श महिला म्हणून तिचे उदाहरण भारतीय महिलांपुढे ठेवले जात होते. २००९ ते २०१८ या काळात चंदा कोचर आयसीआयसीआयची मुख्य कार्यकारी अधिकारी राहिली. २०१८ मध्ये व्हिडिओकॉन घोटाळ्यामुळे तिला राजीनामा द्यावा लागला. तिचे पती दीपक कोचर यांना या घोटाळ्याप्रकरणी ६ महिने तुरुंगातही काढावे लागले होते. २०१२ मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपला आयसीआयसीआयकडून ३२५० कोटी रुपयाचे कर्ज दिले गेले. हे कर्ज दिल्यानंतर सहा महिन्यात चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांनी एनआरपीएल नावाची कंपनी काढली. व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांच्याकडून या कंपनीमध्ये करोडो रुपये ट्रान्सफर केले गेले. या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली, त्यावेळी चंदा कोचर, दीपक कोचर आणि वेणुगोपाळ धूत यांनी बॅंकेची फसवणूक केल्याचे लक्षात आले. चंदा कोचर यांनी बॅंकेचे नियम बाजूला ठेऊन हे कर्ज दिल्याचेही उघड झाले.
केवळ व्हिडिओकॉनच नाही, तर एबीजी शिपयार्ड या कंपनीला आयसीआयसीआयने ७०८९ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कंपनीला दिलेले हे कर्जही आता बुडाले आहे. हे कर्ज देतेवेळेसही चंदा कोचरच बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. एबीजी शिपयार्ड कंपनीच्या या घोटाळ्याची आता चौकशी सुरु आहे.
या आहेत जगाचा चुना लावणाऱ्या चार बायका. महिला पुरुषांपेक्षा कुठेही मागे नाहीत हे त्यांनी याही क्षेत्रात सिद्ध केले आहे.