इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोरोनामुळे माणूस आर्थिक विळख्यात सापडला आहे. अशा संकटावेळी कोणी कोणाला पैसा सोडत नाही. अशा परिस्थितीत बारा हजार रुपयांची रोकड असणारी बॅग मूळ मालकाला देवून निमगाव केतकी येथील स्नेहा बाळू भोंग हिने आपल्यावरील संस्काराचे दर्शन घडवले आहे.
सविस्तर हकीकत अशी की, देविदास जगन्नाथ शिंदे हे आपल्या मुलासह दुचाकीवरुन इंदापूरमधून शेळगावकडे आपल्या कामानिमित्त जात असताना निमगाव केतकी जवळ वाटेतच त्यांची बॅग पडली. त्या बॅगमध्ये बारा हजार रुपये,बँकेचे पासबुक,आधारकार्ड व इतर महत्वाची कागदपत्रे होती.
दरम्यानच्या काळात स्नेहा ही आपले चुलते बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग यांच्या समवेत दुचाकीवरुन इंदापूरहून निमगाव केतकी येथील आपल्या घरी जात असताना, तिला ही बॅग दिसली. तिने भोंग यांना त्याबाबत सांगितले. बॅगमधील कागदपत्रावरुन देविदास शिंदे यांचे नाव पाहून भोंग यांनी रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर यांच्याशी संपर्क साधला.
देवकर यांनी देविदास शिंदे यांना फोनवरून माहिती विचारली. त्यांनी ही घडलेली हकीकत सांगितली. सर्व तपशील सांगितला. खात्री झाल्यानंतर इंदापूरला परतताना स्नेहा व बाबासाहेब भोंग यांनी शिंदे यांना त्यांची बॅग परत केली. स्नेहा व बाबासाहेब भोंग यांचे प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे…










