निरा : महान्यूज लाईव्ह
पुरंदर तालुक्यातील निरा येथील पहिल्या कोरोनाबाधित युवकाने कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. बुधवारी हा युवक ठणठणीत होवून आपल्या घरी आला. त्यावेळी निरा ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांनी फुलांची उधळण करीत आणि टाळ्या वाजवत या युवकाचे उत्स्फूर्त स्वागत केले.
मागच्या आठवड्यात दि. २२ जुलै रोजी निरेत एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी मोठ्या प्रमाणात पसरली. त्यानंतर या युवकाला पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून यशस्वीपणे उपचार घेऊन हा युवक बुधवारी निरेत परतला. त्यावेळी निरा ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल चव्हाण, ग्रामसेवक मनोज डेरे, अॅड. पृथ्वीराज चव्हाण, निरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी घाटगे, आरोग्य सहाय्यक गणेश जाधव, आरोग्य सेवक शिवाजी चव्हाण, बापू भंडलकर, नीरा पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार बाळासाहेब बनकर, कॉन्स्टेबल नीलेश जाधव, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, संजय भंडारी, सचिन ठोंबरे, सुनील थोरात यांनी या युवकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याबाबत बोलताना संबंधित युवकाने नागरीकांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. या आजाराला न भिता योग्य उपचार घेतल्यास अवघ्या आठवड्याभरात या आजारातून मुक्तता होत असल्याचेही त्याने यावेळी नमूद केले. त्याच्या पालकांनीही आनंद व्यक्त केला. याबाबत बोलताना निरेकरांनी अफवांना बळी न पडता, रुग्ण अथवा त्याच्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान, निरेत आतापर्यंत आठजणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निरेतील पहिला कोरोनाबाधित युवक ठणठणीत होवून परत आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून या संकट काळात एकजुटीने त्याला सामोरे जाण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.











