बारामती : महान्यूज लाईव्ह
स्थळ : बारामती..रात्रीचे दिड वाजलेले..आणि फलटण तालुक्यातील एक जीप हॉस्पिटलसमोर थांबते. असह्य प्रसवकळा येत असलेल्या ८ महिन्याची गर्भवती घेऊन तिचे नातेवाईक आलेले असतात. रक्तदाब उच्च असल्याने त्या महिलेसह बाळाचाही जीव धोक्यात असतो..त्यात बाळ पायाकडून असल्याने आणखीच धोका वाढलेला असतो…डॉक्टरांसमोर सिझेरियनचा पर्याय असला तरी त्यात धोकाच अधिक असतो…अशातही आपले कौशल्य पणाला लावून तो देवदूत त्या आईचे तर प्राण वाचवतोच, शिवाय बाळही सुखरूप जन्माला येते…एवढेच नाही, तर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनाही या मातेच्या मदतीला धावून येते आणि जीवनमरणाच्या हिंदोळ्यावर असलेले दोन जीव जणू ` होती बारामती, म्हणून वाचली गर्भवती…याचाच प्रचिती घेतात.
बारामतीतील मेहता नर्सिंग होम हे रविवारी फलटण तालुक्यातील निरगुडी येथील मातेसाठी खरोखरच देवदूताचे स्थान बनले. निरगुडी येथील या गर्भवती महिलेचे ३५ आठवडे पूर्ण झाले होते, तेवढ्यातच रात्री एक वाजता तिला प्रसवकळा सुरू झाल्या. त्यातच या महिलेस एक महिन्यापासून रक्तदाबाचा विकार होता. तो वाढत गेला व उच्च रक्तदाब जडला. रविवारी मध्यरात्री एक वाजता तिला प्रसवकळा अचानक सुरू झाल्या. पोटातील गर्भाची नाळ बाळाअगोदर प्रसवमार्गाबाहेर आली व बाळाचे ठोके एकदम कमी झाले. त्यात रक्तबाद वाढल्याचे दिसताच तेथील डॉक्टरांनी या महिलेस तातडीने बारामती येथे घेऊन जाण्यास सांगितले.
क्षणाचा विलंब न करता ती जीप बारामतीकडे निघाली. बारामतीत जीप पोचली आणि मेहता नर्सिंग होममधील डॉ. विशाल मेहता यांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन तातडीने हालचाली केल्या. डॉक्टरांनी प्रसूती नॉर्मल केली, परंतू पुढे गहन प्रश्न निर्माण झाला. आई वाचली, मात्र बाळाच्या तोंडून शब्द फुटेना. श्वास बंद झालेला, हृदयाचे ठोकेही जवळपास मंद झालेले. बाळाचा रंग काळा-निळा पडू लागला आणि रात्रीच्या दोन वाजता बालरोगतज्ज्ञाला तातडीने पाचारण करता येईना. अशावेळी स्वतः डॉक्टरांनी बाळाचे हृदयाचे ठोके चालू करण्यासाठी प्रयत्न केले आणि बाळ रडले. तोपर्यंत इकडे प्रसूतीदरम्यान उच्च रक्तदाबामुळे महिलेचा अतिरक्तस्त्राव झाला. त्यावर लागलीच उपाययोजना सुरू झाली. काही वेळानंतर हा रक्तस्त्राव बंद झाला आणि आई, बाळ सुरक्षित झाले. त्यानंतरच सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. पहाटे दीड वाजता सुरू झालेली ही जीवनमरणाची लढाई अडीच वाजता यशस्वीरित्या संपली. विशेष म्हणजे एवढे सारे घडूनही नातेवाईकांना आणखी एक सुखद धक्का बसला, तो म्हणजे ही प्रसूती महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून झाल्याने ती मोफत झाली. त्यामुळे फलटणमधून येताना किती पैसे जातात याही विंवचनेत असलेल्या नातेवाईकांना दिलासा मिळाला. पायाळू बाळाची नॉर्मल प्रसूती करण्याचा हा तसा दुर्मिळ क्षण तेथे उपस्थितांनी अनुभवला आणि नातेवाईकही भारावून गेले.
यासंदर्भात डॉ. विशाल मेहता म्हणाले, बारामतीत ही समस्या बऱ्याचवेळी जाणवते. मात्र एकाचवेळी अनेक गुंतागुंती असलेल्या गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी खूप संयम लागतो. यात थोडाही वेळ कमी पडला की केलेले कष्ट वाया जातात. येथे मात्र एक वेगळी प्रसूती झाली, माझ्यासह हॉस्पिटलमधील सर्वच सहकाऱ्यांना समाधान वाटले.










