नानाची टांग
(कोरोनाच्या काळात काही सूज्ञ माणसांनी संध्याकाळच्या बैठकीत (?) आपण कोणा-कोणाला भेटलो हे लिहून ठेवायची आयडीया काढली आणि ती एवढी फेव्हरीट झाली की, सगळ्या ऑफिसेस, सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये एवढेच काय घराघरांतूनही फेमस झाली. लिहून ठेवलं जातंय, जेणेकरून आलोच आपण पॉझिटिव्ह, तर माणूसकीच्या भावनेतून जे जे आपल्याला मागील आठ दिवसांत भेटले, त्यांची पक्की माहिती काढून ते देखील स्वाब द्यायला रांगेत आले पाहिजेत, एवढा उद्देश असावा. काही का असेना, सकस आहार नसल्याने अलिकडे सकाळी काय खाल्लं हे देखील स्मरणात काही राहत नाही, तिथे आठ दिवसांपूर्वी कोण भेटलं हे स्मरणात राहण्याचा विषयच येत नाही, त्यापेक्षा कागदोपत्री बांदबंधिस्ती केलेली बरी.. तर महान्यूजचा नाना अलीकडे कोठेही तोंड खुपसतो. नानाने काही जणांच्या डायऱ्या अक्षरशः चोरून चोरून पाहिल्या. त्या डायऱ्यांमधील काही मजकूर जसाच्या तसा…)
शिक्षकाची डायरी..
आज मा.मु. (माननीय मुख्याध्यापक बरं का, तुम्हाला वाटायचं माननीय मुख्यमंत्री, उगीच भलतंच गैरसमज व्हायचा..) नी एक ऑनलाईन बैठक घेऊन शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाबाबत कडक अंमलबजावणीची सूचना दिली. शाळा सुरू नसल्याने तसंही काहीच काम नाही. आमची (घरातील हो..) बैठक चांगली रंगू लागली आहे. पोरं काही ऐकत नाहीत हो…आम्ही दररोज अभ्यास अपलोड करतो. पण पालक म्हणतात, तुम्ही आम्हाला फोनच द्या. तुम्ही आमच्या घरीच या.. आमच्या पोरांना मोबाईल द्यायला लावून तुम्ही आमची वाट लावली..पोरं अभ्यास कमी, गेमा जास्त खेळत्यात. या असल्या फोनने पार जीव वैतागून गेलाय हो..त्यात मध्येच वर्षाताई अचानकच जाग्या होतात.. कधी म्हणतात जुलै मध्ये शाळा सुरू करू…कधी म्हणतात ऑगस्टमध्ये…मला तर धडकीच भरते. आता सवय मोडून गेली ना राव..शाळेत शिकवायची.. वेळेत पोचायची..! आज तर वर्षाताईंनी ऑनलाईन येऊन धक्काच दिला..म्हणाल्या, पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासात २५ टक्के कपात केली आहे…झालं, आता पाच धडे शिकवून झालेत. एका पालकांचा आजच फोन आला..पहिल्या धड्यात कविता राऊतवर पाच प्रश्न विचारलेत. त्यातील साडेतीनच लिहायचे का? गणिताच्या विषयात १ ते १०० पर्यंतच्या आकड्यांऐवजी ७५ पर्यंतच पोरानं लिहीले तर चालेल ना? आणि भारताचा भूगोल कट करायचाय, तर कुठपर्यंत करू? काश्मिर का कन्याकुमारी, कुठं एन्ड करायचा असाच काहीबाही प्रश्न केला..पार हादरून गेलो ना राव…आता वाटतंय कधीच शाळा भरूच नै…मग १०० टक्केच कपात होईल ना? आज दिवसभरात पाच पालकांचे व मा.मुंचे फोन आलेत.. घराबाहेर पडतंच नाही..पण फोननं काही होत ना?..तरीपण या सर्वांची नावं लिहून ठेवतोच…गरज भासलीच, तर…
एका डॉक्टरची डायरी..
तुम्ही आयुष्यात कितीही आनंदी असा, तुमचं सारं आयुष्य पॉझिटिव्ह ठेवायचं असेल तर आजमितीला तुमचा रिपोर्ट मात्र निगेटिव्हच असला पाहिजे…काय दिवस आलेत राव…! सकाळपासूनच टेन्शनला सुरवात होते..मी स्वतःला कितीही पुरोगामी म्हटले, तरीदेखील अलिकडं देवाला मानल्याशिवाय चैनच पडत नाही. चार उदबत्या जाळल्याशिवाय मी घरातून बाहेर पडतच नाही. खरंतर मी बालरोगतज्ज्ञ.. पण आमच्या दवाखान्यात कोरोनाचे पेशंट आलेत..काय करणार? सैनिक कभी पीछे हटता नही असं म्हणत आणि आम्हाला कोरोनायोध्दे म्हणत त्या आयसीयूमध्ये आमच्या सिनीअर्सनी मला ढकललं…त्या दिवसापासून मी कोरोनाच्याच पेशंटच्या संपर्कात आलोय..तेव्हापासून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय असतं हे पार कळून चुकलंय…परवाच माझं एक पेशंट गेलं….आज माझी कोरोनाची टेस्ट करायची होती, मग काय, सकाळी सकाळी माळावरच्या देवीच्या पाया पडून आलो.. नारळ फोडला…काय करणार?… आज संध्याकाळी माझी टेस्ट निगेटिव्ह आली…हुर्रैरै….आता मी जास्त पॉझिटिव्ह झालोय…! आता कोरोनाच काय, कोरोनाच्या बापाला देखील आपण भिणार नाही असं सिनिअर्सला सांगितलं…पण त्यांनी मी बालरोगतज्ज्ञ आहे आम्हाला आताच कळलं असं सांगितल्यावर पार पार म्हणजे अगदी पारच निगेटिव्ह झालो हो…आता मात्र दोन हाणा, पण कोणीच आम्हाला कोविडयोध्दा म्हणू नका असं म्हणायची वेळ आलीय…कोरोनाचा काळ असूनही दवाखाना उघडा ठेवायचा, आलेल्यांना एन्टरटेन करायचं. ज्यांना गरज आहे, त्यांच्यावर तातडीने उपचार करायचे, जीव धोक्यात तर घालायचाच, शिवाय आलेल्या नातेवाईकांकडूनच आम्ही बिल जास्त घेतोय, म्हणून ऐकून घ्यायचं. सांगा आता काय करायचं!
व्यावसायिकाची डायरी
मनो, मन:, मनो, मन:, मनो, मन: .. आज सकाळी दुकान सुरू केलं, पाच मिनीटंही झाली नाहीत, तोवर पोलिसांची गाडी सायरन वाजवत आली. गाडीतून साहेब उतरले..दुकानापुढं रस्सी का बांधली नाही? म्हणाले. सोशल डिस्टन्स पाळत नाही म्हणून दोन हजार रुपये दंड केला. मी म्हणालो, अहो पाळतोय ना सोशल डिस्टन्स.. सॅनिटायझर ठेवलंय ना..असं म्हटल्यावर त्यांनी सॅनिटायझरची बाटली पाहिली..पाणी जास्त ओतलंय म्हणत त्यावर पण दंड होईल असं म्हटल्यावर गप्प राहणंच पसंत केलं…पोलिस गेले..दिवसभरात दोन हजारांचीही कमाई झाली नाही..उधारी होती, त्यांच्याकडे फोन केला, तर कोरोनाच्या काळात उधारी मागता का? मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय माहिती नाही का? असं म्हणत तोच माझ्यावर डाफरला. फोन बंद केला..एकाला सिमेंट न्यायचं होतं..गाडी घाईघाईत लावून तो आला. पण ठसकतच तो बोलू लागल्यानं मी खुर्ची मागं सरकावून त्याच्या हातावर आधी सॅनिटायझर दिलं..आणि सिमेंट नाही म्हणून थेट खोटंच सांगितलं. त्याचं नाव मात्र यादीत लिहून ठेवलं..न जाणो..
पोलिसदादाची डायरी
अर्रर…काही झालं तरी माणसाने आयुष्यात कधी पोलिस होऊ नये बाबा…कोरोनाच्या अदुगर रस्त्यात ऐटीत उभं राहून लायसन चेक करायचो…आता सायेबांनी सांगितलंय म्हणून उभं राहावं लागतंय…बिगर मास्कचं, डबलशीट कोणी सापडलं,तर शेजारी ग्रामपंचायतीचा माणूस असतोय..तोच पैसे घेतोय..जणू आमच्यावर काही विश्वासच नाही. विश्वास नावाची काही चीजच राहीली नाही राव..संध्याकाळी घरी गेल्यावर घरातली म्हणत्यात क्वारंटाईन व्हा…गावात गेल्यावर लोकं अभिमानानं म्हणतात कोविडयोध्दा आलाय…काय चाललंय काही कळतच नाही..एक मात्र खरंय, जिथं पिकतं, तिथं नक्कीच विकत नाही..हा, पण मीच स्वतःहून पोरांच्या संपर्कात आलेलो नाही…आज नाही…गेली चार महिने झाले, अशीच ड्यूटी आहे…कोणाचा, दवाखान्याचा फोन आला ना की, इथं संशयित आहे, चाललोच त्याच्या घरासमोर…पॉझिटिव्ह आढळलाय, आहेच, त्या बिल्डींगसमोर…रस्त्यावर फिरताहेत, आहेच त्यांच्या मागावर…दुसऱ्यांना कोरोना होऊ नये म्हणून त्यांना घरात बसवण्यासाठी आम्ही मात्र सर्रास फिरतोय…या कोरोनानं काय काय काम लावलीयत बाबा…आता दुकानं उघडी आहेत का? तेही आम्हीच पाहायचं…उघडी असतील, तर बंद करायची, बंद असतील तर उघडी करायची…आमच्याकडं भांडणं कमी येतात, अमुक वस्तीवर तीन जण शिंकले..पाच जणांना खोकला येतोय अशा तक्रारी येऊ लागल्यात..आमचे साहेब पण एकदम वैतागून गेलेत…रात्री झोपेत सुध्दा स्वप्न पडतेत की, जणू आमच्या पोलिस स्टेशनचा दवाखाना बनलाय…आणि आम्ही सारे दंडुक्याएवढे इंजेक्शन घेऊन रस्त्यात थांबलोय, लस द्यायला..!!










