मुंबई : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली आणि कोरोना मुळे होईल की नाही याची धास्ती असलेली पोलीस भरती या वर्षाअखेरपर्यंत घेण्याच्या सूचना गृहमंत्रालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे यावेळी 12538 पदे भरती केली जाणार आहे त्यामुळे राज्यभरातील भावी पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये रिक्त असलेली व प्रलंबित असलेली पोलीस भरती तातडीने पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली. देशमुख यांनीच ही माहिती दिली असून, डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पोलीस भरती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा असे आदेश देशमुख यांनी दिले आहेत.
गेल्या तीन-चार वर्षांपासून पोलीस भरती ज्या प्रमाणात व्हायला हवी ती होत नसल्याने त्याचा परिणाम पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या युवकांवर झाला आहे. त्यातच आता कोरोनाचा काळ असल्यामुळे सर्व घडामोडी बंद आहेत. त्यामुळे आपल्या पोलीस भरती वर कोरोना विरजन तर टाकणार नाही ना अशी भीती प्रशिक्षणार्थ्यांमध्ये होती. आज खुद्द देशमुख यांनीच ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने आता लवकरच भरती होईल अशी चिन्हे आहेत.या वर्षी पोलिस भरती साठी मोठी गर्दी होईल अशी चिन्हे आहेत दरवर्षी अकरा हजार पदे भरण्याची सरकारने यापूर्वी ग्वाही दिली होती मात्र गेली तीन-चार वर्षांपासून हे आश्वासन पाळले गेले नाही.
आज झालेल्या या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे,पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.










