मळद येथील शेतकरी प्रल्हाद वरे यांना केंद्र सरकारच्या कृषी खात्याचा सन्मान..
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या केव्हीकेची कमाल आज पाहायला मिळाली. शेतकऱ्याला आर्थिक,सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवायचे म्हणजे काय? याचा प्रत्यय आज दिल्लीत झालेल्या वेबिनारमध्ये दिसला, जेव्हा मळद तालुक्यातील प्रल्हाद वरे या शेतकऱ्यास पंडीत दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय कृषी पुरस्कार घोषित झाला… गेली ९ वर्षे केव्हीकेच्या माध्यमातून या शेतकऱ्याने ७०० ते ८०० शेतकऱ्यांचे संघटन केले, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली.. करार शेतीद्वारे भाजीपाल्याची परदेशातील निर्यात सुरू केली. एवढे केल्यानंतर स्वतःमधील शेतकरी मरू दिला नाही..स्वतःही व्यावसायिक शेतकरी म्हणून प्रयोग होत गेले आणि पैशाला पैसा जोडला गेला..आज याचीच परिणती म्हणून केंद्र सरकारने याची दखल घेत त्यास पुरस्कार जाहीर केला.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत दिला जाणारा पंडीत दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय कृषी पुरस्कार बारामती तालुक्यातील मळद येथील प्रगतशील शेतकरी व बारामती फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीचे प्रमुख प्रल्हाद वरे यांना ऑनलाईन वेबिनारमध्ये जाहीर करण्यात आली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, कृषी राज्यमंत्री पुरूषोत्तम रुपाला, कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, आयसीएआरचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांच्या उपस्थितीत याची घोषणा करण्यात आली.
या पुरस्काराचे वैशिष्ठ्य म्हणजे ज्या वरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला, ते प्रल्हाद वरे बारामती फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीचे प्रमुख आहेत. अशा शेतकरी उत्पादक कंपन्या केव्हीकेने अनेक उभ्या केल्या व शेतकऱ्यांमधील उद्योजक केव्हीकेने जागवला, त्याला उभे केले, चालते केले आणि हा शेतकरी याच बळावर परदेशातील निर्यातदार बनला. वरेही त्यापैकीच एक!
सन २०११.. प्रल्हाद वरे हे मळद गावचे शेतकरी म्हणूनच परिसरात परिचित होते. त्यांची चौघा भावांची एकत्रित ४८ एकर शेती आहे. या शेतीत उसाची व भाजीपाल्याची पिके घेतली जातात. मात्र जेव्हा प्रल्हाद वरे हे शेतीच्या तंत्रज्ञानाच्या निमित्ताने अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार यांच्या संपर्कात आले, तेथपासून त्यांची शेतीची पध्दतच नाही, तर शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. जे नवे ते हवे अशी संकल्पना धरून त्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी आपली नाळ जोडली. केव्हीकेतील तंत्रज्ञांनीही त्यांना भरभरून दिले. त्यातून सन २०११ मध्ये त्यांनी मळद गावात शेतकरी मंडळ स्थापन केले. हळूहळू शेतकरी येत गेले, जोडत गेले. या शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा मंत्र जपला. एकत्रित खते, बियाणे खरेदी करण्यापासून ते नवे उत्पादन, वाण शोधण्यापर्यंत एकी झाली. मग या एकीतूनच शेतकरी उत्पादक कंपनी जन्माला आली.
बारामती फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीमार्फत त्यांनी ७०० ते ८०० शेतकरी जोडले. त्याच्या जोडीला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनातून सेंद्रीय शेतमालासाठी मोर्फा ही संस्था जन्माला आली. त्याही संस्थेत वरे यांनी मोलाचे योगदान दिले.
शेतकरी घाम गाळून एकदम चांगले उत्पादन पिकवतो, मात्र स्वतः विकत नाही, परिणामी उत्पन्न कमी मिळते, मग फार्मर्स बास्केट हा नवा विक्रीचा पायंडा पडला. बारामतीपासून पुण्यापर्यंत अशा प्रकारची थेट शेतातून ग्राहकापर्यंतची स्वतंत्र व्यवस्था सुरू झाली. पुढे केव्हीकेमार्फत करार शेती करून युरोपमध्ये भेंडी, दुधी भोपळा, मिरची आदी निर्यात सुरू झाली. सन २०१५ पासून ही निर्यात सुरूच आहे. त्यातून जवळपास मळद, गुनवडी व निरावागज परिसरातील ६० एकरावर ही शेती केली जाते.
स्वतः वरे हे व्यावसायिक शेती करतात. वरे यांची कुटुंबाची एकत्रित शेती ४८ एकर शेती आहे. १६ एकर दरवर्षी ऊस असतो. भाजीपाला, तांदूळ, खपली गहू घरीच पिकवला जातो. आता तर मसाला पिके घ्यायची तयारी सुरू आहे. कोरोनाच्या काळात तीन एकर रंगीत कलिंगड त्यांनी केले होते. आतून पिवळी, वरून हिरवी, आतून लाल अशी ३० रुपये किलोने विकली गेली. कोरोनाच्या काळात दीड एकरात २ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.
आज जेव्हा भारतीय कृषी अनुसंधान परीषदेने पुरस्काराची घोषणा केली, तेव्हा वरे यांना भरून आले. या ऑनलाईन वेबिनार प्रसंगी कृषी विज्ञान केंद्रात अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, कृषी विज्ञान केंद्रचे प्रमुख डॉ. सय्यद शाकिरअली, संतोष गोडसे, विवेक भोईटे, डॉ. रतन जाधव, संतोष करंजे, डॉ. मिलिंद जोशी, यशवंत जगदाळे, चंद्रकांत दाते, संदीप बाबर, प्रफुल्ल पोटे आदी उपस्थित होते.










