बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील आमराई परिसरात पाच दिवसांत पोलिसांनी दोनदा कारवाई करीत गांजा पकडला. पाच दिवसांपूर्वी १ लाख रुपये किंमतीचा सव्वा तीन किलो तर आज ५३ हजार रुपयांचा सव्वा दोन किलो गांजा पोलिसांनी पकडला. अर्थात बारामतीला एवढा कडक गांजा पुरवणारा कोण? याचा तपास होऊन गांजाची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे.
पाच दिवसांपूर्वी आमराईतील अनंतनगर भागात दिपक सकट, सेवक सकट या दोन भावांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली, तेव्हा घरातील भांड्याखाली लपवलेला गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला होता. आज समर्थनगर परिसरातून वंदना सोनवणे यांच्या घरातून माठात प्लास्टीकच्या पिशवीत ठेवलेला गांजा पोलिसांनी पकडला. अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील, सहायक निरीक्षक सचिन शिंदे, पद्माकर गंपले, योगेश शेलार या अधिकाऱ्यांसह पोलिस हवालदार सातपुते, राजेश गायकवाड, ओंकार सिताप, सिध्देश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, योगेश कुलकर्णी, उमेश गायकवाड, दशरथ इंगोले, अजित राऊत, अकबर शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिस कर्मचारी अकबर शेख यांनी फिर्याद दिली असून सहायक निरीक्षक सचिन शिंदे याचा पुढील तपास करीत आहेत.
पाच दिवसांच्या अंतराने झालेल्या या कारवाईने बारामतीत कारवाई झाली, तरी गांजा विकला जातोच याची प्रचिती आली आहे, त्यामुळे अंमली पदार्थाच्या साठा, विक्रीवर पोलिसांना नियंत्रणच आणायचे असेल तर या कारवाईत सातत्य असायलाच हवे.










