शिरूर : महान्यूज लाईव्ह
आंधळगाव फाटा (ता. शिरूर) येथे दौंड डेपो आगाराच्या एसटी बसवर २ अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडली असून सदर घटनेत एसटीचा चालक किरकोळ जखमी झाला आहे.
सुनिल जगन्नाथ मंजूळकर (वय -४३ रा. अंबिकानगर पाटस ता.दौंड) असे या घटनेत जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. शनिवारी दि.११रोजी सकाळी दौंड डेपो आगाराची MH- 20- D -9023 ही बस दौंड आगारातून चौफुला मार्गे शिरुरला गेली होती.
शिरुर हून चौफुलाकडे परत जात असताना आंधळगाव फाटा नजीक चौफुला बाजुने शिरूरकडे येणाऱ्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी एसटी बसच्या ड्रायव्हरकडे अचानक दगडफेक केली.यावेळी त्यात एसटीच्या काचा फुटून चालकाला दुखापत झाली. यात बसचेही नुकसान झाले.
या घटनेमुळे पुन्हा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कामावर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांकडून पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली जात आहे. सदर घटनेच्या ठिकाणी शिरुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजेंद्र साबळे, प्रल्हाद जगताप यांनी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.











