दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटसमधील दोन प्रसिद्ध डॉक्टर दांपत्यांनी अखेर अवघ्या सात दिवसात कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूवर मात केली असून ते आज कोरोना मुक्त झाले आहेत. वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुकाराम बनसोडे व पाटसचे आरोग्य सेवक डॉ. भिमराव बडे यांनी दिली.
मागील आठवड्यात केडगाव व बोरीपार्धी येथील एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या पाटस येथील नामांकित डॉक्टर दांपत्यांना २३ जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पाटस परिसरासह दौंडच्या ग्रामिण भागात व वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. दौंडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे, वरवंड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बनसोडे, आरोग्य सेवक डॉ. बडे यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासनानी तत्काळ रूग्णालयाच्या पाचशे मीटरचा परिसरा सील केला. संबंधित रूग्णालयातील दोन महिला कर्मचारी व एका सहायकास ही कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसात निष्पन्न झाले होते.
आरोग्य विभागाने संबंधित कोरोना बाधीत डॉक्टर दांपत्य व त्यांच्या कुटुंब व रूग्णालयाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेवून तब्बल १०४ जणांची कोरोनाची तपासणी केली. या सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आणि मागील सात दिवसापासून कोरोनाने भयभीत झालेल्या पाटसकरांना मोठा दिलासा मिळाला. आज संबंधित डॉक्टर दांपत्य कोरोना मुक्त झाल्याने आरोग्य विभागाचा जीवात जीव आला.. मात्र तरीही नागरीकांनी हलगर्जीपणा करू नये अजून कोरोनाचे संकट संपले नाही. यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करावे, सर्वांनी काळजी व दक्षता घेण्याचे आव्हान आरोग्य विभागाने केले आहे,










