शिरूर (महान्युज लाईव्ह) : दुर्दम्य इच्छाशक्ती व जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर गंभीर आजारावर मात करता आली असल्याचे भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले.
शिरूर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे हे गेल्या काही दिवसांपासून अलिप्त होते.तसेच त्यांचा राजकीय व सामाजिक वावर कमी होता यामुळे तालुक्यात अनेक चर्चा सुरू होत्या.अखेर स्वतः माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचे निदान डॉक्टरांनी केले.हे कळताच थोडे घाबरून गेलो मात्र धाडसी निर्णय घ्यायचे होते.ते सगळे निर्णय एका क्षणी घेतले.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतले.हे सर्व करत असताना उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर पूर्णपणे विश्वास ठेवला.दरम्यान च्या काळात काही काळ अलिप्त राहता आले.या ही वेळी जनतेचे आशीर्वाद,दुर्दम्य इच्छाशक्ती या जोरावर गंभीर आजारावर मात करता आली यामुळे पुन्हा सर्वांसमोर उभा राहिलो असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात अनेकांनी उपहासात्मक टीका केली.”अदृश्य विकास” असे अनेकांनी म्हटले परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुळे करोडो रुपयांचा निधी मिळवता आला.त्याचाच परिणाम तळेगांव – न्हावरा,न्हावरा- इनामगाव- तांदळी सिमेंट झालेला रस्ता,वाघोली येथील होणारा उड्डाणपूल असे कामे होत आहेत.ही कामे आता दिसून येत असून टीका करणाऱ्यांनी हा विकास आता पाहून घ्यावा.
राजकीय वाटचालीविषयी बोलताना ते म्हणाले की,या पूर्वी निवडणूक लढताना अनेकदा किंगमेकर ची भूमिका बजावली आहे.काही दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली असल्याचे दिसून येत असली तरी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून इथेही किंगमेकर ची भूमिका बजावणार आहे.कार्यकर्त्यांना यापुढे बळ दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिरूर हवेलीत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दमदार एंट्री केल्याने शिरूर हवेलीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मोठ्या आजारावर मात केल्याने कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली आहे.











