
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर शहरामध्ये कोरोनाची वाढ कायम असून आज 2 कोरोना महिला रुग्णांची नोंद झाली आहे. इंदापूर शहरातील या 2 रुग्णांसह आता शहरातील एकूण रुग्णांची संख्या 13 वर पोहोचली आहे. आज सकाळी एका 45 आणि 52 वर्षे वयाच्या महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 45 वर्षीय महिला पुणे शहरातील असून इंदापूरमध्ये आपल्या नातेवाईकांकडे आली होती, तर 52 वर्षीय महिला मूळ इंदापूर शहरातील असून तिने पुणे येथे प्रवास केला आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 16 जणांना प्रशासनाकडून क्वाॅरंटाईन करण्याची तसेच कोरोनाच्या तपासणीसाठी स्वॅबचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शहरातील सातपुते वस्तीवरील 52 वर्षीय महिला 1 जून रोजी पुण्यातील कोंढवा भागात लग्नासाठी गेली होती. ती त्याच दिवशी माघारी परतली, मात्र 13 जून रोजी या महिलेला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने तिच्यावर इंदापूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार देेखील करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत या महिलेला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क करण्याचे व माहिती देण्याचा सल्ला दिला. ही महिला आणि तिच्या कुटुंबाने स्वतः प्रशासनाशी संपर्क केला. प्रशासनाने या महिलेस 13 जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात क्वाॅरंटाईन केले होते. तिला त्रास जाणवू लागल्याने 15 जून रोजी तिच्या नातेवाईकांनी तिला लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिथेच 16 जून रोजी तिच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज 17 जून रोजी दुपारी तिला कोरोनाची लागण झाल्याचा अधिकृत अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे, अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.
दुसरीकडे पुण्याहून आपल्या नातेवाईकांकडे आलेल्या व सकाळी कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या 45 वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या 10 जणांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात क्वारंटाईन करण्यात आलेले आहे, तसेच त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली. सातपुते वस्तीवरील 52 वर्षीय महिलेचा अहवाल दुपारी उशिरा प्राप्त झाल्याने तिच्या संपर्कातील 6 जणांशी संबंधित पुढील कार्यवाही करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सध्या सुरू आहे. हे रुग्ण राहत असलेला परिसर नागरिकांसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहेत.










