
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सलग तिसऱ्या दिवशी इंदापूरात पुन्हा एकदा कोरोनाचा आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला. आजवर इंदापूर आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील नसलेला हा रूग्ण असल्याने इंदापूरची चिंता वाढवणारी घटना आहे.
इंदापुर मध्ये काल एका दिवसात एकच कुटुंबातील नऊ जणांना कोरोना ची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर इंदापुरात खळबळ उडाली होती. त्यातच मागील एक-दोन दिवसांमध्ये काहीजणांच्या कोरोना चाचण्या झालेल्या आहेत. त्यामध्ये इंदापूर बायपास रस्त्याचे परिसरात असलेल्या एका 45 वर्षीय महिला रूग्णास दोन दिवसांपासून त्रास होत असल्याने तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तिची कोरोना चाचणी रात्री पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्रशासनास मिळाला. त्यानंतर या महिलेस उपचारासाठी इंदापूर येथीलच कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेले आहे.
इंदापुरात आज व उद्या कडकडीत बंद पाळला जाणार आहे, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रूग्णांमुळे इंदापुरात गर्दी न करण्याची जबाबदारी नागरिकांवर आहे. इंदापुर कोरोनामुक्त ठेवण्यात प्रशासनाने व नागरिकांनी यश मिळवले होते, मात्र त्यानंतरच्या काळात इंदापूरमध्ये आढळलेले कोरोना रुग्ण हे स्थानिक स्तरावरील व कोरोना रूग्णांच्या थेट संपर्कात नसलेले आढळून येत चालल्याने इंदापूरची चिंता वाढली आहे.










