
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरातील कोरोना बाधीतांचा आकडा आता जणू गुणाकार करू लागल्याची शंका येऊ लागली असून आज शहरात तब्बल आठ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटीव्ह आला.
ही माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. दौंड तालुक्यात कोरोनाचा आजच खुटबाव येथे दुसरा रूग्ण सापडला होता, आता दौंड शहरातील कोरोना रूग्णांनी यात मोठी भर टाकली.
आज आढळून आलेल्या सात रुग्णांपैकी एक रुग्ण सात वर्षांची चिमुकली आहे. दौंड शहरातील दत्त मंदिर परिसरातील एका कुटुंबातील १३ जणांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच कुटुंबातील ७ वर्षीय चिमुरडीचा वैद्यकीय अहवाल आज पॉजिटीव्ह आला. तर दुसरीकडे शहरातील राज्य राखीव दलातील गट नं. ७ चे सहा जवान व गट क्र. ५ च्या एका जवानांस कोरोनाची बाधा झाली.
दौंड शहरासह तालुक्यातही कोरोनाचा वाढता संसर्ग दिसू लागला आहे. आता हे रूग्ण नेमके स्थानिक कोरोनाबाधितांच्या संपर्कातून तयार झाले आहेत की पुण्या-मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातून कोरोनाबाधित झाले आहेत याची सध्या माहिती घेतली जात आहे.










