मद्यपींकडून तलवार, पाईपने मारहाण करत ढाब्याची तोडफोड
बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या लॉकडाउन काळात हॉटेलिंग वाचून आपले काही अडत नाही असा साक्षात्कार जरी खवय्यांना झाला असला तरी, बेवड्यांना मात्र त्याचा काही फरक पडलेला नाही, त्यामुळेच ढाब्यावर जेवण दिले नाही म्हणून झालेल्या बाचाबाचीनंतर बेवड्यांनी मित्रांच्या मदतीने सांगवी मध्ये थेट ढाब्यावरच हल्ला केला आणि मारहाण करीत मोडतोड केली.
बारामती फलटण रस्त्यावरील सांगवी नजिक विजय ढाब्यावर मद्यपींच्या टोळक्याने आचारी वेटरसह मालकासही तलवार, गुप्ती, लोखंडी पाईप, कोयत्याने बेदम मारहाण केली. ढाब्यातील वस्तूंची तोडफोड करून नुकसान केल्यावरून माळेगाव पोलीस चौकीत फलटण तालुक्यातील १५ ते १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याची माहिती वेळेत मिळून पोलिसांनीही तत्परता दाखवून पाठलाग करत एकास ताब्यात घेतले, इतर आरोपी फरार आहेत.
राजाळे (ता.फलटण ) येथील पाच ते सहा मद्यपी रविवारी (ता.१४) रात्री सांगवीतील विजय ढाब्यावर जेवणासाठी आले, मात्र. यावेळी ढाबा मालकांनी जेवण बंद असून फक्त पार्सल चालू असल्याचे सांगितल्याने बाचाबाची झाली. काही जणांनी मध्यस्थी करून वाद मिटवल्यानंतर माघारी गेलेल्या मद्यपींनी मित्रांना राजाळे येथून बोलवले आणि येऊन ढाब्याची मोडतोड केली. वेटर व आचाऱ्यास लोखंडी पाईप, तलवार, काठीने बेदम मारहाण केली. त्याचवेळी माळेगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्या पेट्रोलिंग करताना हा प्रकार लक्षात आला, त्यांचे वाहन ढाब्याकडे येत असल्याचे पाहून मद्यपींनी पळ काढला, मात्र पोलिसांनी एकास पकडले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेटर, आचारी बचावले. या घटनेचा पुढील तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे हे करीत आहेत.
याचा व्हिडीओ येथे पहा…
https://m.facebook.com/story.php?story_fbid=171597277716413&id=111857893690352











