महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
तो एक काळ होता… जेव्हा ऐतिहासिक पुण्यनगरीत पहिला नांगर ओढला गेला.. स्वराज्याचं बीज अंकुरले.. अन् तिथून पुढे त्या नांगरधारी रयतेच्या राजाने गवताच्या पात्यालाही भाले फुटतील अशी किमया केली.. आज साडेतीनशे वर्षांनंतरही शेतकऱ्यांचे दुःख नेमकं काय असतं हा प्रश्न सातत्याने पडतो… आज तर तो अधिकच उत्कटतेने पुढे आला जेव्हा, शिवछत्रपतींच्या वारसदाराने.. कोल्हापूर च्या गादीने म्हणजेच खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी एका सामान्य शेतकऱ्यांसोबत तिफन ओढला.. आणि शेतकऱ्याच्या पायाला भेगा का पडतात? हा प्रश्न स्वत:लाच विचारला…!
आज खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे त्यांनी त्यांची फेसबुक पोस्ट जी लिहिली आहे आणि व्हिडिओ त्यामध्ये अपलोड केला आहे त्याची चर्चा अगदी काही वेळातच संपूर्ण राज्यभरात झाली… यामध्ये युवराज संभाजीराजे यांनी लिहिलं की, स्वतःच्या घामाने धरतीला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा अनुभव मी घेतला..!!
संभाजीराजेंच्या या पोस्टने राज्यभरात बळीराजाच्या अंगावर सहजगत्या रोमांच आले. खासदार संभाजीराजे घरी मोटारीतून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला शेतकरी इर्जिकद्वारे तिफन ओढताना दिसले. संभाजीराजेंची मोटार पुढे गेली होती, परंतु युवराज संभाजीराजे यांना शेतातला काळ्या आयुष्य इमान राखणारा बळीराजा आणि त्याच्या शेतात सुरू असलेली मशागतीची धांदल डोळ्यासमोरुन जात नव्हती, त्यांनी चालकाला सूचना करून गाडी मागे घेतली आणि पुन्हा ते तिथे पोहोचले. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून ते शेतात पोहोचल्यानंतर मला तुमच्या सोबत काम करायचे आहे ही इच्छा शेतकऱ्याच्या सांगायची कशी असा प्रश्न खासदार संभाजीराजे यांना पडला. मात्र त्यांच्या येण्याने उपस्थित शेतकरी सुखावून गेले आणि मग काही काळ खासदार संभाजीराजे यांनी त्या शेतकऱ्यांसोबत तिफन ओढला…!
या अनपेक्षित प्रसंगाबद्दल संभाजीराजेंनी म्हटलंय, तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला, मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला.(अंगमेहनतीचे काम नसताना, इतरवेळी सर्वांनी मास्क वापरणे गरजेचे आहे.) कोरोना मुळे संपूर्ण जगाला थांबावं लागलं. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन तो थांबणारही नाही. मी स्वतःच्या शेतातून घरी येत असताना, वाटेत एक संपूर्ण कुटुंब शेतात पेरणी करत असताना दिसले. गाडी पुढे गेली, पण मला ते दृश्य पाहून राहवलं नाही. परत गाडी वळवली आणि त्यांच्याकडे गेलो. सुरुवातीला संकोच वाटला की मी कसा जाऊ? त्यांना कसं विचारू? परंतु न कळत मी त्यांच्या रानात ओढला गेलो. हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे.
साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपतींनी बारा मावळ मुलखात आपल्या संघटन कौशल्यातून समृद्धीची बिजे रोवली. आज काळ्या आईच्या कुशीत पिवळं सोनं रुजवण्याची कमिया साधणाऱ्या बळीराजाच्या कष्टामध्ये छत्रपतींच्या एका वारसदाराने सहभाग घ्यावा आणि बळीराजा प्रति कृतज्ञता व्यक्त केली हे एक सुंदर चित्र दिसले.
हा व्हिडीओ महान्यूजच्या फेसबुक पेजवर व येथे पहा….










