कोरोना चाचण्यांसाठी महाराष्ट्र सर्वात स्वस्त..
मुंबई : महान्यूज लाईव्ह
कोरोनाची चाचणी खासगी प्रयोगशाळांमध्ये नेमकी किती रुपयात करायची यासाठी शासनाने समिती नेमली होती, या समितीने अहवाल दिला असून आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या तपासणीचा दर 2200 रुपये व घरी जाऊन रुग्णाचा स्वाब घेतल्यास 2800 रुपये असा खाजगी प्रयोगशाळेसाठी दर निश्चित केल्याची माहिती दिली.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे होते. आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले, प्रा. अमिता जोशी हे सदस्य होते. या समितीने दिलेला अहवाल व सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून हा दर देशात सर्वांत कमी महाराष्ट्रात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जाहीर केले.
कोरोना चाचणी सर्वात स्वस्त महाराष्ट्रात

राज्यात खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी 4 ते 5000 रुपये आकारतात. मात्र आता 2200 रूपयांपेक्षा अधिक दर आकारता येणार नाही. संपूर्ण देशात एवढे कमी शुल्क अन्यत्र कुठेही नसल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांचा दावा आहे.










