इंदापूर नाभिक महामंडळाची मागणी, दखल न घेतल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा
सुरेश मिसाळ, इंदापूर, महान्यूज लाईव्ह
सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या, अन्यथा नाभिक व्यवसाय दुकानदारास आर्थिक मदत जाहीर करा अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केली आहे, याबाबत महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या इंदापूर तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने सलून व्यवसायिक दुकाने 23 मार्च पासून बंद ठेवली आहेत. शासनाच्या नियमाचे पालन सर्व सलून बांधवांनी केले. मात्र यामुळे आज नाभिक बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक बांधवांनी अनेक वेळा शासनास निवेदन देऊनही त्याची दखल घेतली नाही किंवा कोणतीही मदत जाहीर केली नाही. शासनाने महाराष्ट्रातील सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली, परंतु सलून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली नाही. याचा निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या मार्गदर्शनाखाली या मागण्या करण्यात आल्या.
सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी किंवा सलून व्यवसाय करणाऱ्यास दहा हजार रुपयाची तातडीची मदत द्यावी, तसेच मुलांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी, अशी यामध्ये मागणी करण्यात आली आहे. या सनदशीर आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष रमेश राऊत, इंदापूर तालुका नाभिक महामंडळाचे अध्यक्ष अवधूत पवार, इंदापूर शहर नाभिक महामंडळ अध्यक्ष संतोष क्षीरसागर, उपाध्यक्ष वैभव सुर्यवंशी यांच्यासह इंदापूर तालुक्यातील नाभिक बांधव उपस्थित होते










