दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील कवठे या किसन वीर यांच्या जन्मगावी ११५ व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन कवठे ग्रामस्थांमार्फत करण्यात आले.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाची तीव्रता वाढली असल्याने दरवर्षी आबांच्या विचारांचे प्रबोधन करण्यासाठी राज्यातील नामांकित वक्ते बोलावून त्यांच्या कार्यकर्तुत्वाच्या विषयांना नेहमीच या दिवशी उजाळा देऊन समाजप्रबोधन केले जात होते.
यंदाही कोरोनाच्या सावटामुळे केंद्र व राज्य सरकारने विविध प्रकारच्या उत्सवावर बंदी घातल्याने वक्ते न आणता यावर्षी वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते कवठे येथे उभारलेल्या किसन वीर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
दरम्यान या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन याच ठिकाणी करण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. जयंती कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून भुईंजचे सहायक निरीक्षक आशिष कांबळे यांनी आंदोलनकर्त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कलम १४९ ची नोटीस बजावली होती.
वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी खबरदारीचा उपाय म्हणून १४४ कलम लागू केले होते. त्यामुळे दरवर्षी हा परिसर राज्यातील किसन वीर आबा प्रेमींच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने गजबजायचा, पण ग्रामस्थांनी संयम राखून १४४ कलमाचा अपमान होऊ नये, म्हणून येथे होणा-या कार्यक्रमाची दिशा बदलून भैरवनाथ विकास सेवा सोसायटी सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या आयोजित कार्यक्रमप्रसंगी कवठे येथील प्राथमिक शाळा ते शेरेवस्ती येथे जाणारा रस्त्यावर १० लाख रुपये, पांढरी येथील बंदिस्त गटर बांधणी १० लाख रुपये, महामार्ग ते ज्योतीबा मंदिर रस्ता १० लाख रुपये अशा ३० लाखांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आ. मकरंद पाटील म्हणाले कि देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ब्रिटीश सरकारला महात्मा गांधी यांनी चले जाव चा नारा दिला होता या चळवळीत कवठे गावचे भूमिपुत्र किसन वीर आबांनी स्वतःला झोकून देऊन राज्याचे नेतृत्व केले. आबा हे एक करारी विचारांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या कर्तुत्वाने समाजकारणासह राजकारणात स्वतःचा ठसा उमटवला होता.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, किसन वीर कारखाना, जनता शिक्षण संस्था, यशवंत शिक्षण संस्था व धोम धरण हे शेतकरी हिताचे निर्णय घेऊन स्वावलंबी बनवले. मात्र १४४ कलम आज कवठे येथे त्याच्या जयंती दिवशी लावल्याची खंत वाई तालुक्यातून व्यक्त केली जात आहे. माझे आणि कारखाना अध्यक्षांचे जर साटेलोटे असते तर ते माझ्या विरोधात निवडणुकीला उभे राहिले असते का? किंवा त्यांच्या घरातील महिलेच्या विरोधात आम्ही भुईंज जिल्हा परिषद गटातून विरोधी उमेदवार देऊन तो निवडून आणला असता का? याबाबत कोणी जर बोलत असेल तर ते पूर्ण चुकीचे आहे.
किसन वीर कारखान्यावर १ हजार कोटीचे कर्ज आहे. तुम्ही म्हणताय, आबा लक्ष घाला संस्था वाचली पाहिजे. कारखाना भागभांडवल आहे, ९० कोटी व कारखान्याचा तोटा आहे जवळपास २०० कोटी म्हणजे १०० कोटींचे शाँर्ट मार्जिन असताना कोण कर्ज देणार? या आर्थिक समस्येबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी तीन वेळा चर्चा केली असून यातून समाधानकारक तोडगा निघाल्यास कारखान्याची निवडणूक नक्की लढवली जाईल.
मात्र सर्व सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग मात्र करता येत नाही याचाही विचार व्हायला हवा व एकटा मकरंद पाटील हे सर्व करू शकत नाही, तर त्यासाठी सर्व सभासदांचा पाठींबा असणे महत्वाचे आहे असे आमदार याप्रसंगी बोलले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सत्यजित वीर यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप डेरे यांनी केले.
दरम्यान सायकांळी राष्ट्रवादी राज्य आय. टी विभागाचे प्रमुख सारंग पाटील यांनी किसन वीर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी वाई पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण, उपसभापती भैय्यासाहेब डोंगरे, शशिकांत पवार, मधुकर भोसले, अनिल जगताप, दिलीप बाबर, रवींद्र जाधव, मोहन चव्हाण, दिलीप मोरे, प्रकाश चव्हाण इ. मान्यवर उपस्थित होते
लक्षात ठेवा, आमचा नाद करायचा नाय..!
आज या कार्यक्रमादिवशी १४४ कलम लागू होणे हि दुर्दैवी बाब असून आंदोलनकर्त्यांना आम्ही इशारा देत आहोत, की आमच्या नादाला लागाल तर सोडणार नाही. आपल्याला आंदोलन करायचे होते तर मकरंद आबांचे नाव घेण्यापेक्षा आपले वडील जे की, गेले १४ वर्षे कारखान्याचे संचालक आहेत. त्यांच्या घरीच जनआक्रोश आंदोलन केले असते तरी चालले असते असे उद्गार यावेळी महादेव मस्कर यांनी काढले. हे सर्व उपद्व्याप करण्यापेक्षा अगोदर आपली राजकीय उंची तपासावी असा उपरोधिक टोलासुद्धा त्यांनी दिला.