बारामती : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून लसीचे दोन डोस झाल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याच्या घटना पुढे येत असून, यातही यापूर्वी प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण कमी असायचे; परंतु आता लसीचे दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा व्हेंटीलेटर वर जाण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे लसीचे दोन डोस घेतले आहेत, तेव्हा मास्क वापरण्याची गरज काय? अशा आविर्भावात कोणी राहू नका. कारण लसीचे दोन डोस घेतले म्हणजे अमृताचे थेंब घेतले असे नाही, तर ती एक नियंत्रणाची व रोगाला अटकाव करण्याची फक्त एक प्रक्रिया आहे असं समजा..!
गेल्या काही दिवसांपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना देखील नव्याने कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. एवढेच नव्हे तर ते रुग्ण गंभीर अवस्थेपर्यंत पोचण्याच्या सुद्धा घटना घडल्या आहेत. त्यामुळे लसीचे दोन डोस घेतले म्हणजे सारे काही व्यवस्थित झाले असे समजायचे कारण नाही.
यापूर्वी स्वाइन फ्लूची लस घेतल्यानंतर स्वाइन फ्लू होत नाही यावरती सर्वांचा ठाम विश्वास होता. परंतु आता कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतर सुद्धा कोरोनाची लागण होत असून एचआरसीटी स्कोअर 12 ते 16 पर्यंत वाढत असल्याचे समोर आले आहे. इंदापूर तालुक्यातील तसेच बारामती तालुक्यातील काही रुग्णांच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे काळजी घेण्याची व बेफिकीर न राहण्याची वेळ आताही आहे.
यासंदर्भात आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केली. बारामतीतील कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉ. राहुल जाधव यांनी देखील याला दुजोरा दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन डोस घेतलेले फक्त कोरोनाग्रस्तच होत नाहीत; तर ते गंभीर देखील होत आहेत आणि काही जणांचा मृत्यू देखील झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
कोरोनाच्या लसीची परिणामकारकता ही 70 टक्के, 60 टक्के, 80 टक्के असल्याने काही जणांच्या बाबतीत ती परिणामकारक ठरत नसावी असे असू शकते. याला एकच महत्त्वाचा पर्याय असा आहे की, कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील मास्कचा वापर नियमित व पूर्णपणे सुरक्षित रित्या केला पाहिजे असे डॉक्टर जाधव म्हणाले.
आम्ही या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय संशोधक अभिषेक ढवाण यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले, या लसीचे काम शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करणे हे आहे. शरीरामध्ये येणारा विषाणू रोखणे हे त्याचे काम नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोरोनाच्या दोन लसींचे डोस घेतलेले आहेत, तेव्हा तुमच्या संरक्षणाची परिणामकारकता वाढते.
मात्र तुमच्या शरीरामध्ये विषाणूंचा प्रवेश होतच नाही असे अजिबात नाही. फक्त डोस घेतल्यानंतर देखील मास्कचा पूर्ण परीने वापर केला; तो शास्त्रोक्त पद्धतीने केला तर तुम्हाला कोरोना न होण्याचे प्रमाण अधिक आहे. जर तुम्हाला इतरही व्याधी आहेत; तुम्ही कोरोनाच्या दोन लसीचे डोस घेतलेले आहेत; मात्र तुम्ही मास्कचा वापर करत नाही, तर तुम्हाला कोरोना होऊ शकतो. तो तुम्हाला गंभीर अवस्थेपर्यंत येऊ शकतो अथवा त्यामध्ये मृत्यूदेखील संभवतो.