आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पष्ट उल्लेख, संबंधितांवर कारवाईची नातेवाईकांची मागणी.
राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील खडकी शेतकरी नानासाहेब मच्छिंद्र शेळके यांनी बुधवार ( दि.२५ ) रोजी मध्यरात्री घरालगतच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र आत्महत्या करण्यापूर्वीची चिठ्ठी नातेवाईकांना घरात आढळून आली आहे.
या चिठ्ठीत खासगी सावकार आणि जिल्हा सहकारी बॅकेच्या अधिका-यांनी कर्जासाठी जाच केल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. संबंधित खासगी सावकार आणि जिल्हा सहकारी बॅकेचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, नानासाहेब शेळके या शेतकऱ्याने खाजगी सावकार तसेच गावातील सहकारी संस्था आणि जिल्हा बॅकेकडून कर्ज घेतले होते. या चिठ्ठीमध्ये खाजगी सावकाराबरोबर गावातील एका सहकारी संस्थेच्या सचिवाने तसेच सहकारी बँकेच्या एका अधिकाऱ्याने थकित कर्जाचा भरणा करून घेतला.
मात्र जवळच्या नातेवाईकाबरोबर असलेला जमिनीचा वाद असल्याचे कारण पुढे करून नवीन कर्ज देणार नाही असे सांगितले. यामुळे मी आत्महत्या करणार असल्याचे चिठ्ठीत म्हटंले आहे.
त्यामुळे नानासाहेब शेळके यांची आत्महत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आणि खासगी सावकार,सहकारी संस्थेचे अधिकारी आणि जिल्हा बॅकेच्या अधिका-यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे चिठ्ठीवरून सिद्ध होत आहे.
नानासाहेब शेळके यांनी कर्ज प्रकरणासाठी बारामती येथे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पुणे सहाकरी जिल्हा बँकेचे विद्ममान अध्यक्ष रमेश थोरात यांची भेट घेतली होती. यांनी शेळके यांना कर्जमंजुर करण्याचे आदेश संबंधितांना दिले होते.
मात्र तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी कागदोपत्री प्रकरणाची पूर्तता होत नसल्याचे कारण पुढे करीत कर्ज देण्यास टाळले. नानासाहेब शेळके यांनी ज्या दिवशी आत्महत्या केली. त्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर संबंधितांचे ४६ मिस कॉल आले असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
यामध्ये खाजगी सावकार तसेच मध्यस्थांचे फोन होते. आत्महत्या पूर्वीची चिट्टी सापडल्याने खळबळ माजली असून दौंड पोलीस तसेच महसूल अधिकाऱ्यांनी कारवाईस सुरवात केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार याबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या ताब्यातील पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या खडकी (ता.दौंड) येथील शाखेच्या शाखा अधिकाऱ्याचे व सहकारी सोसायटीच्या सहसचिव आणि खासगी सावकार यांची नावे या चिट्ठीमध्ये असल्याने या सर्वांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.