अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
पुणे : महानगरपालिका हद्दीत अलीकडेच नव्याने २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांचा नीटनेटका आणि सुनियोजित विकास करायचा असेल तर या २३ गावांसह हवेली तालुक्यातील उर्वरित गावांचा समावेश करुन एक नविन महापालिका स्थापन करावी आणि हा निर्णय महापालिकांच्या आगामी निवडणुकीपूर्वी घ्यावा अशी मागणी माजी राज्यमंत्री व जेष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब शिवरकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश
केल्यानंतर, त्यांचा पुन्हा नव्या महापालिकेत समावेश करण्याची बाब जटील आणि गुंतागुंतीची ठरणार आहे. त्यातून या गावाच्या विकासाचे नियोजन दिशाहीन होणार आहे.
त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकी घेण्यापूर्वी गावासाठीच्या नव्या महापालिका स्थापनेचा निर्णय होणे गरजेचे आहे. आज ही गावे पुणे मनपा हद्दीत घेतली गेल्याने पुणे मनपाचे विस्तार क्षेत्र अवाढव्य झाले आहे. या नव्या क्षेत्राच्या विकासाकडे किंवा त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठीची पुरीशी यंत्रणा पुणे महापालिकेकडे नाही.
पुणे मनपाचे आयुक्त किंवा अन्य वरिष्ठ अधिकारी या गावाकडे दैनंदिन स्वरुपात लक्ष देवु शकणार नाहीत. याचा गैरफायदा घेवून या नव्या गावांच्या हद्दीत बेसुमार बांधकामे व अतिक्रमणे होण्याचा धोका आहे. भविष्यातल्या या सा-याच अडचणी लक्षात घेवून या २३ गावांचा बरोबरच हवेलीतील उर्वरित गावे घेवून नविन महापालिका स्थापन करणे सर्वच दृष्टीने सोयीचे व संयुक्तिक ठरणार आहे.
त्यामुळे या गावक-यांच्या भवितव्याशी कोणताही खेळ न करता महापालिका निवडणुकीच्या आधी नव्या महापालिकेची घोषणा करणे ही काळाची गरज आहे असेही शिवरकरांनी म्हटले आहे.











