मुंबई : महान्यूज लाईव्ह
गेल्या सहा वर्षापासून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांची अचानक डी बी मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
आता एका सुरक्षारक्षकाच्या बदलीत विशेष काय? असे वाटेल; पण अमिताभ बच्चन यांच्याकडून त्यांना वर्षाला दीड कोटी रुपये मिळत असल्याचा आरोप असल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचे समजते.
शिंदे यांची आता डी बी मार्ग पोलीस ठाण्यात बदली झाली असून, ते अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. अनेक कार्यक्रमांमध्ये ते बच्चन यांचे अंगरक्षक म्हणून वावरताना दिसायचे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान देखील त्यांचा तेथे सहभाग असायचा.
अमिताभ बच्चन यांना एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्याने दोन सुरक्षारक्षक त्यांच्यासमवेत असतात. मात्र कोणताही सुरक्षारक्षक पाच वर्षापेक्षा जास्त एका जागी काम करू शकत नाही, या नियमानुसार जितेंद्र शिंदे यांची बदली करण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
परंतु त्यांना अमिताभ बच्चन यांच्याकडून दीड कोटी रुपयांची दर वर्षी कमाई होत होती, अशा स्वरूपाची माहिती पोलिस खात्यापर्यंत पोहोचल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे त्यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
मात्र जितेंद्र शिंदे यांनी अशा स्वरूपाची कोणतीही अधिकची रक्कम अमिताभ बच्चन यांच्याकडून मिळत नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिंदे यांची स्वतःची सुरक्षा एजन्सी असून त्याच्या मार्फत ते अभिनेत्यांना तसेच सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवतात. ही एजन्सी त्यांच्या पत्नीच्या नावावर असून, त्यांची पत्नी ही सुरक्षा एजन्सी चालवते अशी माहिती शिंदे यांच्याकडून दिली गेल्याचे सांगितले जात आहे.











