कार्यक्रमाच्या अखेरीस गालबोट !
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या शेवटी सत्कार चालू असताना शिवाजी कृष्णा चितळकर या शेतकऱ्याने वीज तोडल्याच्या कारणावरुन संतप्त भावना व्यक्त करत कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच दोरीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या शेतकऱ्याने आणलेला दोर व त्याच्या चेहर्यावरील संतप्त असणारी भावना पाहून यावेळी थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
आज (शनिवार) झगडेवाडी या ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तसेच राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या शेवटी गाव व पंचक्रोशीत विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात येत असताना शेतकरी शिवाजी कृष्णा चितळकर हे व्यासपीठावर येऊन ताई व मामा माझे शेतीचे विज कनेक्शन कोणतेही थकीत बिल नसताना तोडले गेले.
लाखो रुपयांचा उभा ऊस जळू लागला आहे. आता मी काय करू म्हणत सोबत आणलेल्या स्वतःच्या खिशातील दोर काढून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवले.
त्या शेतकऱ्याची समजूत काढली. अन्यथा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सध्याच्या वीज बिलाच्या तोडणीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी राजाचा संयम संपल्याने तो स्वतःचे काहीही केले असते. रागाच्या भरात व्यासपीठावर गेलेल्या शेतकऱ्याने जीवाचे बरे वाईट केले असते. सदरील घटनेवेळी वीज वितरण समितीचे इंदापूर तालुका अध्यक्ष तसेच झगडेवाडीतील कार्यक्रमाचे आयोजक ही उपस्थित होते.
घडलेल्या परिस्थितीबाबत वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी शेतकऱ्यास विचारले असता, आपली व्यथा पत्रकारांना सांगत असताना काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यास बोलण्यास मज्जाव केला.