बारामतीत ६०० रिक्षाचालकांना कोरोनाचा असाही फटका..
बारामती : महान्यूज लाईव्ह
दोन महिने खायचे वांदे होते, आता ३० मे पासून रिक्षा चालवायला परवानगी मिळाली, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ३० ते ५० रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळत नाहीत. काही जणांना तर गिऱ्हाईकच दिवसभर मिळत नाही, घरातला खर्च तर काही संपत नाही. सरकारने रिक्षा सुरू केली, पण बस नसल्याने गिऱ्हाईक कुठून मिळणार? सगळीकडून कोंडी झालीय बघा..रिक्षाचालक संघटनेतील पदाधिकारी प्रमोद चव्हाण यांची ही व्यथा..
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सर्वाधिक परवड ही रिक्षाचालकांची झाली. रिक्षावरच पोट असणाऱ्यांचे खायचे वांदे झाले होते. जवळपास दोन महिन्यानंतर ३० मे पासून रिक्षा सुरू झाल्या. पण बराच काळ बंद असलेल्या रिक्षा चालू करताना अडचणी आल्या. त्यांची दुरुस्ती करून रिक्षा त्यांच्या नेहमीच्या स्टॅण्डवर दिसू लागल्या. शहरातील गर्दी वाढली. पण रिक्षात बसणाऱ्यांनी वर्दी तर द्यायला हवी. शहरात दुचाक्या फिरताहेत, पण रिक्षा अपवादानेच दिसतात. आंतरजिल्हाबंदी असल्याने बसेस तुरळक सुरू आहेत. परिणामी प्रवासी मोठ्या संख्येने नसल्याने रिक्षाचालकांना नेहमीप्रमाणे ग्राहक मिळत नाहीत, त्यामुळे रिक्षाचालक वैतागले आहेत.
प्रमोद चव्हाण हे या रिक्षाचालकांपैकी एक. ते काही काळ रिक्षाचालकाच्या संघटनेचे पदाधिकारीही होते. त्यांनी या रिक्षाचालकांनी व्यथा सांगितली. ते म्हणाले, सकाळी नऊ वाजता रिक्षा स्थानकावर लावली, तर चार वाजेपर्यंत जेमतेम ३० ते ५० रुपये मिळतात. रिक्षावाले कंटाळून जातात. काही जणांना तर एकही गिऱ्हाईक मिळत नाही. ३० मे पासून आम्ही रिक्षा चालविण्यास सुरवात केली. आता घरी गेल्यावर अगोदर आंघोळ करावी लागते. घरापासून रिक्षा स्टॅंण्डपर्यंत रिक्षा आणतो, त्याचेही पैसे निघत नाहीत अशी स्थिती आहे. बारामती शहरात ६०० रिक्षा चालक आहेत. आरटीओ कार्यालयाने रिक्षामध्ये दोन प्रवाशांना परवानगी दिली आहे, मात्र एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एक प्रवासी तेवढी रक्कम देऊ शकत नाही. परिणामी रिक्षाकडे कोणी फिरकत नाही अशी स्थिती आहे.











