जेजुरी : महान्यूज लाईव्ह
राज्यात झिका विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येताच प्रशासनाने पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजनांची पावले उचलली आहेत, तर राज्यातील पहिला झिका रुग्ण बेलसर भागात आढळल्याने आरोग्य खाते देखील सतर्क झाले आहे. त्यातूनच पुरंदर तालुक्यातील बेलसर ग्रामपंचायतीने बेलसर गावात मोफत निरोधाची पाकीटे वाटली आहेत.
झिका विषाणू हा गर्भवती स्त्रियांसाठी धोकादायक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून बेलसर परिसरात ग्रामपंचायतीने निरोधाची पाकिटे वितरित केली आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय तज्ञांनी देखील चार महिने गर्भधारणा टाळण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकारचा विचित्र सल्ला वाटत असला, तरी आरोग्याच्या दृष्टीने व वैद्यकीय दृष्टीने ही महत्त्वाची खबरदारी घेण्यात आली आहे.
डॉ. भरत शितोळे, वैद्यकीय अधिकारी, बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्र : झिका विषाणू चा पहिला रुग्ण पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात आढळल्याने ही खबरदारी घेण्यात आली असून गावात सर्वत्र धूर फवारणी केली जात आहे. या गावातील २४ गर्भवती महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आले आहेत. महिलांच्या रक्ताचे नमुने देखील तपासले असून यात कोणीही झिका ग्रस्त आढळले नाहीत.
धीरज जगताप, उपसरपंच बेलसर ग्रामपंचायत : गावांमध्ये विविध पद्धतीच्या खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात असून ग्रामपंचायतच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.