सरकार कडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्रास देण्याची भूमिका
इंदापूर तालुक्यात वीज तोडणी मोहीम जोरात
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सद्यस्थितीला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोनामुळे त्याचे कंबरडे मोडले आहे.तसेच सध्या शेतकऱ्याकडे पैसे उपलब्ध होतील असे कोणतेही पीक शेतात नसल्याने शेतकरी लगेच वीज बिलाचे पैसे भरू शकत नाही.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्या ऐवजी शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम हे सरकार करत आहे, महावितरणने शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये महावितरणने वीज तोडणी मोहीम सुरू केली आहे. काल बुधवारी निमगाव केतकी, गोतोंडी, अजोती, पडस्थळ आदी अनेक गावांच्या परिसरात डीपी सोडवून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करणेचे काम सुरू केले आहे.
त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी आज गुरुवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी केली.
यासंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याने वीज तोडणी मोहीम तत्काळ थांबवावी व खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी अधिकार्यांकडे केली.
गेली एक महिना झाले पावसाने दडी मारल्याने शेतातील उभी पिके कोमजून गेली आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्यावरती पिके जगवण्यासाठी शेतकरी वर्ग धडपडत आहे. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना शेतकरी वर्गाला दिलासा देणे गरजेचे असताना महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे.
शेतकऱ्यांना मदत करणे सोडून हे सरकार उलट शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम करीत आहे. राज्य शासनाच्या शेतीपंपांची वीज तोडणी मोहिमेमुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्ग संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे.
जर महावितरणने वीज तोडणी मोहीम थांबवून शेतकऱ्यांचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला नाही, तर मात्र भाजपच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी सरकारला दिला आहे.