देशांतर्गत रेल्वे वाहतूक सुरू, सोशल डिस्टन्सिंगचे अनेक ठिकाणी तीन तेरा
दिल्ली : महान्यूज लाईव्ह
करोनाच्या महामारीतच पाचवा लॉकडाऊन जाहीर झाला आहे,अर्थात हा लॉकडाऊन नावालाच आहे, कारण फक्त शाळा, थिएटर, हॉटेल्स वगळता सगळ्या गोष्टी खु्ल्या झाल्या आहेत. आज एकाच दिवसात २०० रेल्वेंमधून १ लाख ५० हजार जणांनी प्रवास केला आहे.
कोरोनाच्या काळात बहुतेक ठिकाणी जिल्हाबंदी आहे. एसटी बसेसची जिल्हाबंदी अजून उठलेली नाही. आंतरराज्य प्रवासाला बंदी आहे. मात्र रेल्वे देशांतर्गत सुरू आहे. आज पहाटे मुंबईतूनही वाराणसीकडे जाणारी पहिली रेल्वे सुटली. या रेल्वेने स्थलांतरीत मजूरांना व महाराष्ट्रात अडकलेल्या युपीवासियांना युपीमध्ये पोचविण्याची व्यवस्था केली. आता महाराष्ट्रातून दररोज ४० हून अधिक दिर्घपल्ल्याच्या रेल्वे जातील व काही रेल्वे महाराष्ट्रात येतील.
रेल्वेने कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यास रेल्वेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असे स्पष्ट करूनही रेल्वेसाठी जाणारे मजूर सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवत असून कोरोनाचे जणू सावटच दूर झाले आहे, अशा थाटात रेल्वेस्थानक परिसर व आवारात गर्दी करीत आहेत. अर्थात ज्यांनी आरक्षण केले आहे, अशांनाच सध्या प्रवास करता येत आहे.










