राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : जिल्हयात झिकाचे रूग्ण आढळ्यानंतर जिल्हयातील तालुकानिहाय गावे खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॅा.राजेश देशमुख यांनी जाहीर केली आहेत.
यामध्ये दौंड शहरासह तालुक्यातील कुरकुंभ, हिंगणीबेर्डी या गावांचा समावेश आहे. तालुक्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश ही जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
दौंड शहरातील समतानगर, होलारवस्ती तर तालुक्यातील कुरकुंभ, हिंगणीबेर्डी ही दोन गावे अतिसंवेदनशील जाहीर केली आहेत. यापुर्वी डेंगी, चिकनगुनीया यांचे रुग्ण आढळून आले आहेत
अशा गावांचाही अतिसंवेदनशील मध्ये समावेश असणार आहे. डेंगी आणि झिका या विषाणुची लक्षणे बहुतांश सारखीच आहेत. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे, झिका होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी परिसर स्वच्छ ठेवावा, जुने टायर्स, फुटके डब्बे, निरूपयोगी वस्तू नष्ट कराव्यात, डासांपासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक मलमांचा वापर करावा,
आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, मच्छरदाणीचा वापर करावा, फुल बाह्याचे व पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालावेत, डास उत्पन्नाची स्थाने नष्ट करावीत पाणी साठविण्याचे हौद, पाण्याच्या टाक्या घट्ट झाकणाने झाकाव्यात असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी झिका प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी नियमावली जाहीर केली असून गाव पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास राज्य सरकारने ग्रामपंचायतींना परवानगी दिली आहे.
त्यानुसार ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर आवश्यक त्या प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा कर्तव्यात कसूर केल्यास आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सरपंचावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायद्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.











