दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : येथील व्याहळी पुनर्वसन, कडेगांव, मालुसरेवाडी, व्याजवाडी गावांच्या
हद्दीमध्ये तसेच वैराटगडच्या पायथ्याशी चाललेले बेकायदेशीर उत्खनन बंद करणेबाबत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसिलदार रणजीत भोसले यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, व्याहळी पुनर्वसन, कडेगांव, मालसुरेवाडी, व्याजवाडी हृददीमध्ये वैराटगडाच्या पायथ्याशी काही धनदांडग्यांनी बेकायदेशीरपणे पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन सुरू केले आहे. वैराटगड हा व्याजवाडी मालसुरेवाडीचे वैभव असून आज त्या गडावरती हजारो पर्यटक भेट देत आहेत.
डोंगरावर सामाजिक संस्था डोंगराचे सौंदर्य वाढवण्यासाठी वृक्ष लागवडीसारखे उपक्रम घेत असतात. आज जर आपण पाहिले तर संपुर्ण महाराष्ट्राभर पावसाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे वाईमधील कोंढावळे गावातील देवरूखवाडी मध्ये डोंगराचे भुस्खलन होऊन काही लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तसेच काही लोक आज रोजी बेघर आहेत. शेती मोठया प्रमाणात वाहुन गेली आहे.
अशी परिस्थिती असताना देखील व्याहळी पुनर्वसन, कडेगांव, मालुसरेवाडी, व्याजवाडी हददीमध्ये खुले आम उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन ज्या धनदांडग्यानी सुरू ठेवले आहे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात
यावी. तसेच त्या पाठीमागे कोणाकोणाचे हात आहेत याची चौकशी करण्यात यावी. जर यावरती योग्य न्याय न मिळाल्यास व उत्खनन बंद न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार आहे.
या निवेदनावर श्रीकांत निकाळजे, रुपेश मिसाळ, सागर शिंदे, सुर्यकांत गायकवाड, अनिल सणस, बाजिगर ईनामदार, जोत्स्ना गायकदाड आदींच्या सह्या आहेत.











