मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या राज्यपालांच्या दौऱ्याकडे राज्य शासनाने पाठ फिरवली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व महाविकास आघाडी सरकारमधील वाद आता चा्ंगलाच चिघळला असून राज्य सरकारने नाराजी व्यक्त करूनही राज्यपालांनी त्यांचा हेका कायम ठेवल्याने हा वाद चिघळल्याचे सांगितले जात आहे.
राज्यपाल कौश्यारी यांचा राज्यात हस्तक्षेप वाढत चालल्याने महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. सरकारमधील कॅबिनेट मंत्री व राज्यपाल असा वाद शिगेला पोचला असतानाच मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी सरकारची नाराजी राज्यपाल भवनला कळवली. मात्र त्यानंतरही राज्यपालांनी वरील तीन जिल्ह्यांचा दौरा रद्द केला नाही. राज्यपाल हे राज्यात दोन सत्ताकेंद्रे निर्माण करीत असल्याची टिका महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्यानंतर पुन्हा या दौऱ्याने हा वाद आणखीच वाढला आहे.
या दौऱ्यात राज्यपाल कौश्यारी हे अल्पसंख्याक विभागाच्या वसतीगृहाचे उदघाटन करणार आहेत. तसेच या तीनही जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. यासंदर्भात कामगारमंत्री नवाब मलिक तसेच हसन मुश्रीफ यांनीही नाराजी व्यक्त करून या तीनही जिल्ह्यांचे पालकमंत्री आपापल्या नियोजित दौऱ्यात व कार्यक्रमात असतील, ते राज्यपालांच्या दौऱ्यात सहभागी असणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.











