मुंबई : महान्यूज लाईव्ह
कोरोना होऊन वडीलांचा मृत्यू झाल्याची शंका आल्याने दोन बहिणींनी आता आपल्याला क्वारंटाईन करतील या भीतीने वडीलांचा मृतदेह तब्बल चार दिवस घरात लपवून ठेवला व दोघींनीही आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यामध्ये एकीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी व भयानक घटना मुंबईतील पश्चिम विरार येथील ग्लोबल टाऊनशीप मध्ये घडली.
पश्चिम विरार येथील ग्लोबल सिटी टाऊनशीपमधील ब्रोकलीन अपार्टमेंटमधील कुटुंबात हा प्रकार घडला. श्री. सहरकर हे अन्न पुरवठा विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना दोन अविवाहित मुली आहेत. पत्नी व त्यांच्या दोन मुलींसह ते मागील आठवड्यातच भाड्याने येथे राहण्यास आले होते.
दरम्यान १ ऑगस्ट रोजी सहरकर यांचे निधन झाले. त्यांच्या ४० वर्षीय मुलगी विद्या व ३६ वर्षीय स्वप्नाली या दोन मुलींना वडीलांचे निधन कोरोनामुळे झाल्याचा संशय आला. हे लोकांना समजले, तर आपल्या सर्वांना क्वारंटाईन केले जाईल व येथे राहता येणार नाही अशी भीती वाटल्याने वडीलांचा मृतदेह घरातच ठेवला. मृतदेहाचा वास येऊ नये यासाठी कापूर, डांबर गोळ्या तेथे ठेवल्या होत्या.
त्यानंतर विद्या हिने विरारच्या नवापूर समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. तिचा मृतदेह मंगळवारी आढळून आला. त्यानंतर काल (बुधवारी) स्वप्नाली हिने देखील समुद्रातच उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी तिला वाचवले.
त्यानंतर तिच्या माहितीतून सर्वांना हा भयानक प्रकार माहिती झाला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी व सहरकर यांच्या घरीही भेट दिली. त्यांनी सहरकर यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र पोलिसांच्या अंदाजानुसार यामागे कौटुंबिक व आर्थिक कारणही असू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विरार पश्चिम पोलिस व अर्नाळा पोलिस पुढील तपास करीत आहेत.











