राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरून निलंगा ते भिवंडी (मुंबई ) एसटी बसमधून प्रवास करणारा चार प्रवाशांना लुटणाऱ्या संशयितांचे पोलिसांनी रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे.
अज्ञात तीन जणांनी पोलीस असल्याचे सांगत एसटीमधून मारहाण करीत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तु अशा 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 रुपयांचा ऎवज चोरी करून पसार झाल्याची घटना पाटस येथील ढमाले वस्तीजवळ मंगळवारी (दि.3) रात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास घडली होती.
या लुटमारीतील एका संशयित आरोपींचे रेखाचित्र पोलीसांनी प्रसिध्द केले असून या इसमाची कोणाला ओळख पटल्यास तातडीने यवत आणि पाटस पोलीसांची संपर्क साधवा असे आवाहन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी केले आहे.
न्यू इंडिया कुरीअर सर्व्हिस कंपनीत काम करणारे कर्मचारी हितेंद्र बाळासाहेब जाधव (वय 29 रा. वाघोशी ता. फलटण जि. सातारा ) हे निलंगा ते भिवंडी या एसटी बस मधून प्रवास करीत असताना मंगळवारी (दि.3) रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापुर महामार्गावर पाटस हद्दीतील ढमाले वस्तीजवळ बस थांबवून तीन अज्ञात इसम एसटीमध्ये चढले.
पोलीस असल्याचे सांगून प्रवाशांना मारहाण करीत बसमधून खाली उतरवून तुम्ही दोन नंबर धंदा करता, तुमची तक्रार आली होती, तुम्ही आज सापडला असे म्हणून त्यांच्याकडील रक्कम ठेवलेली बॅग व मोबाईल तसेच मौल्यवान वस्तु अशी 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 रूपयांचा ऎवज काढून चोरी करून पसार झाल्याची घटना घडली होती.
याबाबात हितेंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून पाटस पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे,पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे आणि गुन्हे शाखेच्या पथकाच्या टिमने पाटस येथे धाव घेतली.
आरोपींच्या शोधात ग्रामीण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांची तीन ते चार पथके तैनात केली आहेत. दरम्यान, या लुटमारीतील आरोपी हे पाटस उड्डाण पुलाजवळील गावतलावलगत असलेल्या पानटपरी जवळ थांबले असता टपरी चालक सुनिल शितोळे यांनी पाहिले होते.
त्याच्या सांगण्यावरून रेखाचित्रकारांनी एका संशयित आरोपीचे रेखाचित्र रेखाटले आहे. हे रेखाचित्र पोलीसांनी प्रसिध्द केले असून या इसमांची ओळख पटल्यास त्वरीत यवत पोलीसांची संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. या लुटमारीतील आरोपी छडा लावून लवकरच जेरबंद करू अशी माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.











