दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईच्या पश्चिम भागातील जोर या गावात आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पाऊस वेळी दरड कोसळताना तीस लोकांना वाचवणार्या अनिता पांडुरंग सपकाळ आणि त्यांचा मुलगा सचिन हे दोघेही या दगड मातीच्या लोंढ्याबरोबर वाहून गेले होते. ११ दिवसानंतरही ते आढळून आले नाहीत. त्यामुळे निराशाच पदरी पडल्याने एनडीआरएफ ची टीम माघारी परतली.
ऐन बेंदुर या सणाच्या दिवशी दि.२२ जुलै रोजी दिवसरात्र मुसळधार पाऊस पडत असताना केळाचे नकाड हा डोंगरा कोसळताना पाहणाऱ्या अनिता पांडुरंग सपकाळ (वय ३५) व मुलगा सचिन पांडुरंग सपकाळ (वय २०) या दोघांनी आरडाओरडा करत वस्तीवरील जवळ पास ३० माणसं घराबाहेर काढण्यास यश मिळवले, पण आलेल्या काळाला चकवा देत माणसं वाचविण्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तिचा फायदा या मायलेकरांना झाला नाही..
दुर्दैवाने डोंगर उतारावरील भरघाव वेगाने वरुन झाडे, दरड आणी मातीचा ढिगारा कोसळून लगतच असणारा पोवाच्या ओढ्यातून आलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याबरोबर मातीच्या लाटा आणी मोठमोठी दरडी आई अनिता यांच्या शरीरावर आदळल्या. क्षणार्धात आई जमीनीवर आदळल्याने त्या पुराचे पाणी आणि मातीच्या लाटांसोबत वाहुन जात असतानाच सचिन पांडुरंग सपकाळ (वय २०) या त्यांच्या मुलाने पाहिले.
त्यानेही क्षणाचाही विचार न करता आईला वाचविण्यासाठी त्या वेगवान मातीच्या लाटेत उडी टाकली. पण नियतीला हे मान्य नसल्यानेच काळाने या आई आणि मुलावर झडप घातली. ही मायालेकरं क्षणार्धात धोमबलकवडी धरणातील मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. पती पांडुरंग सपकाळ, चुलत भाऊ नारायण सपकाळ यांनी शेकडो ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या पत्नीचा आणि मुलाचा शोध सुरु केला, पण दुर्दैवाने त्यांना आज ११ दिवस उलटले तरी ते जिवंत किंवा मृत अवस्थेत सापडले नसल्याने जोर गावावर शोककळा पसरली आहे.
जिल्हाधिकारी, वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर आणि तहसीलदार रणजित भोसले यांना या गंभीर घटनेची माहिती मिळताच या मायलेकरांचा गतीने शोध घेण्यासाठी पुण्यातुन
एनडीआरफची टिम मागवली. पण जोर गावाकडे जाणारे रस्त्यावरील पूल काही ठिकाणी वाहून गेल्याने त्या गावापर्यंत या टिमला मुसळधार पावसामुळे जलद पोहचता आलं नाही.
मात्र या टिमला घेऊन स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले हे दोन्ही जबाबदार अधिकारी टिमसोबत धोम बलकवडी धरणावर पोहचले. तहसीलदार धरणाच्या भिंतीवर थांबले, तेथुन पुढे प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर एनडीआरफच्या बोटीव्दारे या जवानांना घेऊन जोर गावातील भर पावसात घटना स्थळावर दाखल झाल्या.
शोध मोहीम सुरू झाली पण मृतदेह हाती लागले नाहीत. पण वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर यांनी हार न मानता हे मृतदेह शोधुन
काढण्यासाठी पुन्हा २९ जुलै रोजी आणखी एक २४ जवानांची एक टिम मागवून पुन्हा शोध मोहीम सुरू केली होती.
त्या जवानांनी दोन पोकलेन मशीनच्या साह्याने गेली दोन दिवस मृतदेह शोधण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले, पण धरणात गाळाचे आणि खोलीचे प्रमाण जास्त असल्याने पोकलेन मशीन गाळात कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने या जवानांनी ३० जुलै रोजी रात्री शोधमोहीम थांबवून परत जाण्याचा निर्णय घेतला.
अर्थात यामुळे बेपत्ता असलेल्या अनिता पांडुरंग सपकाळ आणि त्यांचा मुलगा सचिन पांडुरंग सपकाळ ही दोन्ही मायलेकरं जिवंत आहेत की, त्यांचा मृत्यू झाला आहे हे सांगणे सध्या तरी वाई महसूल प्रशासनाला सांगणे अवघड झाले आहे.











